तेल कंपन्यांनी रविवारी रात्री पेट्रोल २ रूपये १६ पैसे व डिझेलच्या दरात २ रूपये १० पैशांची कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. महाराष्ट्रातील नागरिक मात्र याबाबत कमनशिबी ठरले आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निर्णय घेऊन २४ तास होण्यापूर्वीच राज्य सरकारने इंधनावरील अधिभार वाढवून नागरिकांना झटका दिला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ एक रूपयानेच घटले आहेत. इंधनावरील अधिभार वाढवण्याची राज्य सरकारची गेल्या काही दिवसातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही इंधनाचे दर कमी झाल्यानंतर राज्यसरकारने लगेच अधिभार वाढवला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये रोष असल्याचे दिसून येत आहे.

इंधन अधिभार वाढीचा निर्णय राज्यात लगेचच अंमलात आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून इंधनावर वाढीव अधिभार घेण्यास सुरूवात झाली. राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक अवस्थेत असल्याचे बोलले जाते. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर मद्य विक्रीस बंदी घातल्यामुळे उत्पादन शूल्क विभागाकडून येणारा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. ही महसूल तूट भरून काढण्यासाठी इंधन अधिभार वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येते.