राज्याचा वर्ष २०१९-२०चा अंतरिम अर्थसंकल्प आज (बुधवारी) दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तीन महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करण्यासाठी सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना जाहीर करून भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याशिवाय प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत असलेली दोन हेक्टरची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रोजगाराबाबत आणि महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांबाबत भरीव निधीची तरतूद होईल, असे बोलले जाते.