महाराष्ट्र- कर्नाटक  यांच्यातील सीमावादामुळे अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या सीमावासीयांच्या मदतीला पुन्हा एकदा महाराष्ट्र धावला आहे. कर्नाटकातील वीज संकटाचा सर्वाधिक फटका गेल्या काही दिवसांपासून सीमाभागाला बसत होता. मात्र या भागासाठी राज्यातून तब्बल १५० मेगाव्ॉट वीज दिली जात असल्याने बेळगावसह धारवाड, चिक्कोडी, निपाणी या सीमाभागातील लोकांच्या घरात प्रकाश पडला असून भारनियमानाचे संकट तूर्तास दूर झाले आहे.
राज्यात पुरेशी वीज असल्याने गळती आणि थकबाकीचे प्रमाण अधिक असलेलया काही गावांचा अपवाद वगळता भारनियमन  बंद झाले आहे. त्याचवेळी शेजारील कर्नाटक राज्यात मात्र पुरेशी वीज नसल्याने भारनियमन करावे लागत असून याचा सर्वाधिक फटका सीमाभागाला बसत आहे. त्यामुळे या भागासाठी कर्नाटक सरकारने राज्याकडे वीजेची मागणी केली होती. त्यानुसार १५० मेगाव्ॉट वीज कर्नाटक सरकार महाराष्ट्राकडून खरेदी करीत असून ही वीज बेळगाव, धारवाड, निपाणी या सीमाभागातील गावांसाठीच दिली जात आहे. त्यामुळे सीमाभागावरील भारनियमनाचे संकट दूर झाले आहे. महावितरणच्या ऐरोली येथील नियंत्रण केंद्रातून कर्नाटकातील वीजेच्या वितरणावर नजर ठेवली जात असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.