माझ्या मार्गात व्यत्यय आणण्याची शिवसेनेची क्षमता नाही. मी भाजपचा खासदार झालो आहे, आता शिवसेनेने त्यांना काय करायचे याचा निर्णय घ्यावा, अशा शब्दांत नारायण राणे यांनी गुरुवारी शिवसेनेला डिवचले. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भवितव्याबाबत आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या  विरोधामुळे नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात समावेशाचा आग्रह सोडून राज्यसभेवर जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागला आहे. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर  टीका केली. भाजपने राज्यातील मंत्रिपदापेक्षा राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल समाधानी आहे. शिवसेना आपल्या मार्गात अडथळा आणू शकत नाही.  आता शिवसेनेने ठरवावे त्यांना काय करायचे आहे ते. बहुधा ते उद्या सकाळी सरकारमध्ये नसतील, असा चिमटा राणे यांनी काढला. भाजपच्या चिन्हावर खासदारकी स्वीकारल्यानंतर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काय होणार, असे विचारता आठवडाभरातनिर्णय घेण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.