राज्यात उष्णतेची लाट; आणखी दोन दिवस तीव्रता वाढणार; वर्धा ४५, चंद्रपूर ४४
राज्यासह देशात उष्णतेची तीव्र लाट आली असून येत्या दोन दिवसांत ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण वगळता संपूर्ण राज्य उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघाले. शनिवार आणि रविवारीही राज्यातील बहुतांश भागांत पारा चाळिशीपार पोहोचण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
राज्यात विदर्भ तसेच मराठवाडय़ात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. वर्धा येथे शुक्रवारी तब्बल ४५ अंश से. तर चंद्रपूर येथे ४४.६ अंश से. तापमानाची नोंद झाली. शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढणार आहे. त्यामुळे पुणे, धुळे, कोल्हापूर याठिकाणीही पारा चाळीशीपार जाण्याची शक्यता आहे. यावर्षी उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने दिला होता. एप्रिल महिन्यात आतापर्यंत तीन वेळा उष्णतेच्या लाटांची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटांच्या मागोमाग अवकाळी पाऊस व गारा पडण्याची शक्यता असते. यावेळी राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची तसेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाडय़ासह उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. शुक्रवारी तर देशभरासह राज्याच्या काही भागातही तापमान ४० अंश से.च्या वर गेले. तेलंगण राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व व पश्चिम राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा आदी राज्यांसह महाराष्ट्रातही उष्णतेचा पारा चढाच राहिला. शुक्रवारी वेधशाळेच्या देशभरातील सुमारे २५ केंद्रांवर तापमान ४० ते ४५ अंश से. यांच्यादरम्यान नोंदले गेले. राज्यात विदर्भ व मराठवाडय़ात तापमान ४० अंश से.च्या पुढे गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. यात वध्र्यामध्ये ४५ अंश से. इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर येथे ४४.६ अंश से., अकोला येथे ४४.४ अंश से., नागपूरला ४४.२ अंश से. इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.

.. तब्येत सांभाळा
* दुपारच्या वेळेस शक्यतो बाहेर पडणे टाळा. उन्हातून जावे लागल्यास छत्री, टोपी, गॉगल यांचा उपयोग करा
* पुरेसे प्याणी प्या. चक्कर आल्यास सावलीत जा

विक्रमी तापमानाची नोंद
सध्या महाराष्ट्रातील काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड व कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये विक्रमी तापमान नोंदले जात असल्याचे स्कायमेट या संस्थेने म्हटले आहे.

Untitled-29