लवकरच ऑक्टोबर उकाडा

नवरात्रीपर्यंत लांबलेला पाऊस आता निरोप घेण्याच्या वाटेवर असून राज्यातील बहुतांश ठिकाणी दसरा कोरडाह्ण जाणार आहे. रविवारी कोकण व विदर्भात काही ठिकाणी वातावरण ढगाळलेले होते. मात्र सोमवारपासून ढगांचे आच्छादन विरळ होणार असून पावसाचा प्रभावही उणावणार आहे. राज्यातून मोसमी वारे परतल्याचे अधिकृतपणे जाहीर होण्यासाठी वेळ असला तरी ऑक्टोबर हीटला सुरुवात झाली असून येत्या आठवडय़ाभरात सरींच्या जागी उन्हाच्या झळा सुरू होतील, असा अंदाज आहे.

दोन वर्षांच्या दुष्काळानंतर राज्यात यावर्षी जोरदार वृष्टी झाली. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्र व कोकणात बस्तान बसवलेल्या पावसाने यावेळी सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक कामगिरी केली.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत लांबलेला पाऊस आता मात्र निरोपाचे बोल ऐकवत आहे. देशाच्या वायव्य भागातून म्हणजे राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली या राज्यांसह उत्तर प्रदेश व गुजरातच्या काही भागातून मोसमी वारे बाहेर पडल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. मध्यप्रदेश व गुजरातच्या बहुतांश भागातून मोसमी वारे परतण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यापुढचा क्रमांक महाराष्ट्राचा असेल. सध्या गोव्याजवळ चक्रीवातसदृश्य स्थिती असून त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा शिडकावा होईल. मात्र नजिकच्या काळात पाऊस आणणारी वातावरणीय स्थिती दिसत नसून यानंतर अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यताही कमी आहे. रविवारी कोकण तसेच विदर्भात ढगाळ वातावरण होते व काही भागात तुरळक सरी आल्या. मात्र सोमवारपासून पुढील पाच दिवस राज्याच्या सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून गेल्या चार दिवसातच मुंबईत त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. पावसामुळे मुंबईतील कमाल तापमान २७ अंश से. पेक्षा पुढे जात नव्हते.

गेल्या मंगळवारी मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल २६.६ अंश  से. तापमान नोंदले गेले. मात्र गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कमाल तापमानाने तब्बल पाच अंश से.ने उसळी घेतली आहे. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.५  अंश से. होते.