सध्या चीनमधील उत्पादन उद्योगातील कंपन्या भारताकडे सक्षम पर्याय म्हणून पाहतात. अर्थात व्हिएतनामसारख्या देशांची स्पर्धा आपल्याला आहे. त्यामुळे वेगाने हालचाली करून या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्यात आपण पुढाकार घ्यायला हवा. ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ विकसित करून उद्योग क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी महाराष्ट्रासमोर आहे, असे ते म्हणाले.

धोरणांच्या पातळीवर विचार करता मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीवर विशेष लक्ष दिले पाहिजे. चांगला मोबदला असलेला रोजगार निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. भारताची या क्षेत्रातील वाढीची क्षमता अफाट आहे. मात्र, त्याकडे आपण गांभीर्याने पाहात नाही. मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक नाकारण्याचे कोणतेच कारण महाराष्ट्रासमोर नाही. उद्योग क्षेत्रातील एक प्रवाह म्हणून न पाहता स्वतंत्र, नव्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून मनोरंजन क्षेत्राच्या विकासाचा विचार व्हावा. त्यात फक्त चित्रपट क्षेत्र नाही तर इतरही अनेक घटकांचा विचार व्हावा. तिसरे महत्त्वाचे क्षेत्र विचारात घ्यायला हवे ते म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादन निर्मिती. नैसर्गिक उत्पादनांबाबतचे आकर्षण वाढत आहे, त्याचप्रमाणे यात गुंतवणूक करण्यासही लोक उत्सुक आहेत. महाराष्ट्र या क्षेत्राचे ‘केंद्र’ म्हणून विकसित होऊ शकतो, असे महिंद्र यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, धोरणे यातून उद्योग क्षेत्रासाठी पोषक वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्षे जपले गेले आहे.

याशिवाय काळानुसार बदल करणे आणि ते स्वीकारणे हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ आहे. मात्र, मनुष्यबळावरील खर्च किंवा अशा काही मुद्दय़ांमुळे मोठय़ा उद्योगांना इतर देश खुणावत आहेत. आता स्पर्धा वाढली आहे, हे लक्षात घेऊन वाटचाल करायला हवी. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा विचार करता चांगले मनुष्यबळ मिळण्यासाठी आपल्या शहरातील जीवनावश्यक खर्च आणि तुलनेत जीवनशैलीची गुणवत्ता याकडे डोळसपणे पाहायला हवे, असेही महिंद्र यांनी नमूद केले.

तो प्रत्येक जण माझा एजंट

ट्विटरच्या वापराबाबत मला नेहमीच विचारले जाते. लोकांशी संवादातून जोडून घेण्याचे हे एक चांगले साधन आहे. त्याचा वापर सकारात्मक आणि जबाबदारीने व्हायला हवा. वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रमंडळींच्या शोधासाठी मी ट्विटरवर नसून व्यवसायासाठी, ग्राहकांना चांगली सेवा देता यावी, त्यांच्याशी जोडून घेता यावे यासाठी मी ट्विटर वापरतो. आमचं काय चुकतंय, आम्ही काय सुधारणा करायला हव्यात हे ग्राहक निर्भीडपणे सांगतात. त्यादृष्टीने मोबाइल कॅमेरा असणारी प्रत्येक व्यक्ती माझी एजंट असते, असे महिंद्र यांनी सांगितले.

 

फडणवीस शैलीचे कौतुक

आडमार्गाने परवानगी मिळवण्याची पद्धत महिंद्रमध्ये कधीही नाही. त्यामुळेच कदाचित अनेकांच्या अपेक्षेनुसार आमची वेगाने वाढ झाली नसावी. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर एक सुखद धक्का बसला. आमची कांदिवली येथे जमीन आहे. ती पर्यटन क्षेत्रासाठी राखीव आहे. तेथे मनोरंजन नगरी उभारण्याचा प्रकल्प आम्ही आखला. चित्रपट संग्रहालय, स्टुडिओ, रिसॉर्ट अशा अनेक गोष्टी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून कधीही परवानगी मिळणार नाही, असे वाटत होते. प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केल्यावर त्याची फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे असल्याचे कळले. माझा तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याशी फारसा परिचय नव्हता. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘भेटायला या’ असा निरोप मिळणार, असे वाटत होते. पण लगेच काही दिवसांत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे कळले. त्यानंतर एका कार्यक्रमात फडणवीस यांची भेट झाली. ‘आपण कधी यापूर्वी भेटलो नाही. मात्र, कोणत्याही अपेक्षेशिवाय आमच्या कंपनीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे आश्चर्य वाटले,’ असे मी त्यांना सांगितले. त्यावर, मी फक्त प्रस्तावच मंजूर केला नाही, तर पुढे काही अडचणी येऊ नयेत, अशी सूचनाही प्रशासनाला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. असा कारभार पाहून मला सुखद धक्का बसला, अशा शब्दांत आनंद महिंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान कारभाराचे कौतुक केले.