मुंबई : अवयवदानाच्या चळवळीत महाराष्ट्राने गौरवशाली कामगिरी केल्याने राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेने (नॅटो) राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर उत्कृष्ट राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशात सर्वाधिक अवयव प्रत्यारोपण तमिळनाडूमध्ये (२९५) झाले असून त्याखालोखाल करोनाकाळातही वर्षभरात २१३ अवयव प्रत्यारोपण महाराष्ट्रात झाले आहेत. अवयवदानाविषयी जनजागृती केल्याने अवयवदान आणि प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात वर्षभरात अवयवदानाविषयी जनजागृतीचे साडेतीनशेहून अधिक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच अवयवदान अधिकाधिक होण्यासाठी मेंदूमृत रुग्णांचे निदान करून संपूर्ण प्रक्रिया करणे यातही राज्याने चांगली कामगिरी केली आहे. अवयव प्राप्त झाल्यानंतर तातडीने प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून देणे, उपलब्ध निधीचा अधिकांश वापर करणे आणि अवयव प्रत्यारोपणासाठी सर्वाधिक नोंदणी करणे या राज्याच्या कामगिरीकरिता हा पुरस्कार देण्यात आल्याचे राज्य आणि विभागीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.