अशोक चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर

भारतात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर तर आहेच, शिवाय प्रत्यक्ष गुंतवणुकीत परावर्तित होण्यातसुद्धा महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट होते, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. गुंतवणुकीत महाराष्ट्र पीछाडीवर गेल्याच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या टीकेला देसाई यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्या अहवालाचा आधार घेत गुंतवणुकीबाबत भाष्य केले ते प्रस्तावांचे आकडे आहेत, प्रत्यक्ष गुंतवणुकीचे नाहीत. हे माहिती असूनही सरकारला विरोध म्हणून त्यांनी बिनबुडाचे आरोप केले. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत असेल तर ते अधिक गंभीर आहे, असे देसाई म्हणाले. अशोक चव्हाण यांना जर गुंतवणुकीचे प्रस्ताव किती आले, हे पाहायला वेळ मिळाला असेल, तर त्याच संकेतस्थळावर प्रत्यक्षात किती प्रकल्प सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित झाले, हेही पाहता आले असते. त्यात महाराष्ट्रातील ११ तर कर्नाटकातील केवळ ३ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल ते जून २०१८ या पहिल्या तिमाहीची जारी केलेली आकडेवारी पाहिली तर आजही सर्वाधिक ३१ टक्के विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात आल्याचे निदर्शनास येईल, असे देसाई म्हणाले.