पालिका आणि राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे एकत्रित काम; सुनियोजित पर्यटनस्थळ उभारण्याचा निर्णय

मुंबई : दक्षिण मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’चे भव्य ऐतिहासिक स्मारक जतन करण्याचे राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ठरवले आहे. या विभागात सध्या पोलिसांच्या सुरक्षा चौक्या, पर्यटकांची गर्दी, तिकिटासाठीची व्यवस्था यांची गर्दी आहे. ही सगळी गर्दी हटवून एक संध असे सुनियोजित पर्यटनस्थळ उभारण्याचा प्रयत्न के ला जाणार आहे. राज्य सरकार आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईची ओळखच! इंग्रज जेव्हा देश सोडून गेले तेव्हा शेवटचे जहाज या बंदरातून गेल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळे या स्मारकाला विशेष महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या स्मारकाच्या परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव उभारलेल्या अडथळ्यांमुळे हे स्मारकही नजरेच्या एका टप्प्यात पूर्ण दिसू शकत नाही.

तसेच पोलिसांच्या चौक्या, पर्यटकांच्या तिकीट खिडक्या, शौचालय, सीसीटीव्हीची यंत्रणा, विजेचे स्तंभ यांमुळे या परिसरात एकच गर्दी झालेली दिसते. तसेच या परिसरात असलेला शिवाजी महाराजांचा पुतळाही दिसत नाही. त्यामुळे या स्मारकाभोवतीचे अडथळे हटवून या सगळ्यांचा एकसंध विकास करण्याचे पर्यटन विभागाने ठरवले आहे. त्याकरिता सल्लागार नेमण्यात आला असून नुकतीच एक बैठक या संदर्भात पार पडली. याबाबत नुकतेच पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सादरीकरणही करण्यात आले.

या पर्यटन स्थळातील स्मारक राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र आजूबाजूच्या परिसराचा विकास हा पालिके च्या अखत्यारीतील आहे. तसेच येथील जमीन मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी पर्यटन विभागाने बीपीटी, पोलीस, पालिका, पुरातत्त्व विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन एकसंध व्यवस्थापन आराखडा तयार के ला होता. या परिसरातील तिकीट खिडक्या, विजेचे खांब, पोलीस चौक्या यांची रचना या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला पूरक अशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अपंग पर्यटकांसाठी खास सुविधा देण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्मारकाचे जतन

या पर्यटन स्थळातील स्मारकाचे जतन करण्याचाही निर्णय घेतला आहे. स्मारकाची स्वच्छताही करण्यात येणार आहे. या एकसंध जतनाचा आराखडा तयार करण्याचे काम एका सल्लागाराला देण्यात आले आहे. स्मारकाचे जतन करण्यासाठी काय करता येईल, त्याचाही समावेश असणार आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम करावे लागणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि विशेषत: पर्यटनाभिमुख अशा पद्धतीने हे जतन करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.