जर्मनीतील उत्सवासाठी पर्यटन विभागाचा आता ७१ लाखांचा प्रस्ताव

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

जर्मनीतील कार्ल्सरुह या छोटय़ा गावात होणाऱ्या उत्सवातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला फारसा फायदा होणार नसतानाही पर्यटन विभागाने सादर केलेला पाच कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. या उत्सवासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच फक्त ७१ लाखांचा  प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

या छोटय़ाशा गावातील उत्सवात पर्यटन मंत्री तसेच सचिव यांच्यासह अधिकाऱ्यांची वारी सहभागी होणार होती. आता फक्त दोन कनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या उत्सवासाठी पाच कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता‘ने २६ जून रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर लगेचच पर्यटन विभागाने पाच कोटींऐवजी पूर्वीच्याच ७१ लाखांच्या खर्चाला मान्यता दिली.

पर्यटन विभागाकडून सुरुवातीला तेवढय़ाच खर्चाचा प्रस्ताव सादर झाला होता. मात्र यंदा या उत्सवावर पाच कोटींपेक्षा अधिक खर्चाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पर्यटन विभागाच्या संचालकांनी तसा प्रस्ताव सादर केला. मात्र हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करताना गेल्या वर्षीप्रमाणेच ७० लाख किंवा त्यापेक्षा दहा टक्के अधिक खर्चाचेच समर्थन केले होते. पर्यटन विभागाच्या उपसचिवांनीही अशीच री ओढल्याने त्यांची बदली करण्यात आली. प्रत्यक्षात या महोत्सवासाठी पाच कोटींच्या खर्चाचीच नस्ती सादर करण्यात आली होती. याआधी पर्यटन विभागाने अनेक महागडे उत्सव ज्या एका महिलेमार्फत कार्यान्वित केले होते, त्याच महिलेवर या महोत्सवाचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती. माहिती व जनसंपर्क विभागाच्या पॅनेलवरील कंपन्यांची यासाठी निविदेद्वारे निवड करण्यात येणार असली तरी ही महिला ज्या कंपनीचे नाव देते त्याचीच निवड होते, असे बोलले जाते.  आता मात्र हा प्रस्ताव रद्द झाला आहे.

कार्ल्सरुह येथे होत असलेल्या इंडियन समर डेज फेस्टिवलमध्ये एका करारान्वये महाराष्ट्र दरवर्षी सहभागी होतो. मागील वेळेस महाराष्ट्रामार्फत एक स्टॉल होता. मात्र यंदा व्यापक प्रमाणात सहभागी होण्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता आणि तो वाजवी होता. मात्र आता महाराष्ट्राच्या सहभागाची रुपरेषा बदलण्यात आली आहे, असा दावा करीत पाच कोटींच्या खर्चाचे समर्थन पर्यटन विभागाने केले आहे.