दिवा-सावंतवाडी प्रवासी गाडीला रोह्याजवळ झालेला अपघात रूळाला तडा गेल्याने झाल्याचा दावा केला जात असला तरी एकूणच घसरलेल्या डब्यांची स्थिती पाहता इंजिनचे चाक जाम झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली असली तरी रोहा पोलिसांकडून सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीतही इंजिनचे चाक जाम झाल्याची शक्यता नोंदविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत आताच तर्क काढणे शक्य नसले तरी रेल्वेशी संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
डबे घसरल्यामुळे अलीकडच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर झालेला हा दुसरा अपघात. मात्र या अपघातात २१ जणांचा बळी गेल्यामुळे या अपघातामागील विविध कारणांचा ऊहापोह केला जात आहे. नेमका कशामुळे अपघात घडला हे चौकशीअंती स्पष्ट होणार असले तरी घसरलेल्या डब्यांची स्थिती पाहता इंजिनच्या देखभालीचा प्रश्नही आता ऐरणीवर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.रेल्वे रूळांची तपासणी चार वर्षांतून एकदा होते, अशी माहितीही पोलीस तपासादरम्यान पुढे आली आहे. या रूळांची तपासणी २०१३ मध्ये झाली होती. दिवा-सावंतवाडी गाडीला अपघात होण्याआधी काही मिनिटे एक लांब पल्ल्याची गाडी गेली होती. रेल्वे रूळाला तडा असता वा रूळ तुटलेला असता तरी डबे एकमेकांवर येऊन आदळले नसते. इंजिनाची चाके जाम होऊन ते एका बाजूला पडल्यानेच डबे एकमेकांवर आदळले असावेत, असा दावाही आता केला जात आहे. गाडीचा वेग नेहमीपेक्षा अधिक होता, असाही एक आरोप होत आहे. या गाडीचा वेग साधारणपणे प्रति तास ६० किलोमीटर इतका होता. मात्र नेमका वेग किती होता हेही समजू शकणार आहे. कोकण रेल्वेच्या इंजिनमध्ये तब्बल तीन महिन्यांपर्यंतच्या गाडीच्या वेगाची नोंद होते, अशी माहितीही या सूत्रांनी दिली. उष्णता वाढल्यानेही रूळांना तडे जाण्याचे प्रकार घडतात. परंतु तेवढी उष्णता सामावून घेण्याचीही रूळांची क्षमता असते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.रविवारी झालेल्या अपघाताच्या वेळी शासनाच्या १०७ क्रमांकावरून तब्बल सात रुग्णवाहिका काही मिनिटांत पोहोचल्या होत्या. याशिवाय डबे घसरल्यानंतर प्रवाशांना तात्काळ घटनास्थळावरून इच्छितस्थळी पाठवण्यासाठी रोहा उद्योगपट्टय़ातील कंपन्यांच्या बसगाडय़ांचा वापर करण्यात आला. त्यामुळे घटनास्थळी हाहाकार माजला नाही. मेडा गावातील ग्रामस्थांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे अनेक जखमींना रुग्णालयात हलविणे शक्य झाल्याचेही पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केल़े