News Flash

Mumbai Unlock : “सध्याच्या परिस्थितीत मुंबई तिसऱ्या गटात, पण…”, महापौरांनी दिली आकडेवारी!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५ टप्प्यांमधील अनलॉकच्या नियोजनानुसार मुंबई तिसऱ्या गटात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

mumbai lockdown
मुंबई लॉकडाऊनचे प्रातिनिधिक छायाचित्र

राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या ५ टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन बेड्सची व्याप्ती या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तेथील नियम देखील बदलणार आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये मुंबई नेमकी कोणत्या गटात आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापारी, दुकानदार, स्थानिक यांच्यामध्ये हा संभ्रम असून त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये असल्याची माहिती महापौरांनी दिली. मात्र, याविषयी सविस्तर चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकेल, असं त्या म्हणाल्या.

 

मुख्यमंत्री माहिती देतील!

दरम्यान, राज्य सरकारने मध्यरात्री उशीरा अधिसूचना जारी केल्यानंतर नेमकी नियमावली आणि मुंबई कोणत्या गटात असेल, तिथे काय नियम लागू असतील, यासंदर्भात मुख्यमंत्री संध्याकाळपर्यंत घोषणा करतील, अशी माहिती यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. कालच्या तपासणीमध्ये एकूण ९६३ नवे रुग्ण तर बरे झालेले रुग्ण १२०७ आहेत. कालपर्यंत रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे. तसेच रुग्ण दुपटीचा दर ५१५ दिवसांचा आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा रेट ५.३१ वर आहे, तर ऑक्सिजन बेड ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत व्याप्त आहेत. त्यामुळे आपण तिसऱ्या गटामध्ये आहोत. त्यामुळे येत्या सोमवारपासूनच्या अनलॉकच्या पहिल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या गटामध्ये असू शकते. मात्र यासंदर्भात संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील”, असं त्या म्हणाल्या.

‘अनलॉक’चा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध

नियमावली संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल!

“राज्य सरकारने ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक गटासाठी निकष दिले आहेत. त्यानुसार शहरांची किंवा जिल्ह्यांची विभागणी केली जाणार आहे. आपण आत्ताच्या घडीला तिसऱ्या गटात आहोत. यानुसार जी नियमावली मुख्यमंत्र्यांकडून सांगितली जाईल, तेव्हा त्यानुसार आपल्याला नियम पाळावे लागतील. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल”, असं देखील महापौरींनी स्पष्ट केलं.

लोकलविषयीचा निर्णय…

“राज्य किंवा केंद्राच्या नियमावलींचा आढावा घेऊन मुंबईत कोणते नियम पाळावे लागतील, यासंदर्भात पालिका स्वतंत्र परिपत्रक काढेल. लोकल प्रवासाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून घेतील. त्या निर्णयानुसार आपण कार्यवाही करणार आहोत”, असं किशोरी पेडणेकर यांनी नमूद केलं.

Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या

या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी

पहिला गट – ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट – पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट – पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट – पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट – पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 11:14 am

Web Title: maharashtra unlock 5 stage guidelines mumbai category mayor kishori pednekar pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Video : मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली – भाग ५
2 Maharashtra Unlock : लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार का?; आदेशात महत्त्वाची माहिती
3 सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार!
Just Now!
X