सर्वच विभागांतून मंत्रिपदांसाठी मोठी चुरस

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला १२ मंत्रिपदे येणार आहेत. मंत्रीपदासाठी पक्षात मोठी चुरस आहे. एवढय़ा कमी संख्येने मिळणाऱ्या मंत्रीपदाचे वाटप करताना सामाजिक व प्रादेशिक समतोल साधण्याचे पक्षापुढे मोठे आव्हान आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे संकेत आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसमध्येही वेगाने हालचाली सुरु आहेत.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर, विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी आघाडीचा उमेदवार निवडून आणणे यात सरकारने बाजी मारली. आता १६ डिसेंबरपासून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात फक्त सहा मंत्री आहेत. त्यांचे खातेवाटपही अजून झालेले नाही. त्याचबरोबर तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचे जे सूत्र ठरले आहे, त्यानुसार त्यात्या पक्षांचे मंत्री कोण होणार, यावर अजून निर्णय व्हायचा आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रीपदी  कुणाकुणाची वर्णी लावायची यासाठी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु असल्याचे समजते.

शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असले तरी सत्ता वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप देण्यात आले आहे. राष्ट्रवादीला १६ मंत्रीपदे, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्रीपदे ,तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे देण्याचे ठरले असल्याची माहिती काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने दिले. काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले, हा एक पक्षाला अधिकचा लाभ असल्याचे मानले जाते.

काँग्रेसला मिळणाऱ्या १२ मंत्रीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी सर्वच विभागातून मोठी चुरस आहे. मात्र तुटपुंज्या मंत्रीपदांचे वाटप करताना प्रादेशिक व सामाजिक समतोल साधण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत होते की काय अशी चर्चा सुरु असताना पक्षाला दोन जागा अधिकच्या मिळाल्या. विदर्भातून काँग्रेसचे पंधरा आमदार निवडून आले आहेत. याच विभागातून मंत्रीपदासाठी  रस्सीखेच सुरु आहे. पहिल्या टप्प्यात डॉ. नितीन राऊत यांना मंत्री करण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी पाच वजनदार आमदार स्पर्धेत असून, आणखी तीन मंत्री या विभागातून होतील, असे सांगण्यात येते. नाना पटोले यांची  विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने मंत्रीपदासाठीचा एक स्पर्धक कमी झाल्याचे सांगितले जाते.

मराठवाडय़ातून काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले आहे. या विभागातून दोन मंत्री होतील, असे समजते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मंत्रीदाचे दावेदार आहेत. दुसरा मंत्री कोण यावर खल सुरु आहे. पश्चि महाराष्ट्रातून दहा आमदार आहेत. या विभागातूनही तीन मंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जाते. या वेळी पुणे जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे पाच आमदार आहेत. त्यापैकी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पहिल्या टप्प्यातच मंत्री झाले आहेत. या विभागातून आणखी एक मंत्री करण्याबाबत विचार सरु आहे. आदिवासी समाजाला या विभागातून प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. कोकणात काँग्रेसची कोरी पाटी आहे. मुंबईत फक्त चार आमदार आहेत. मुंबईतून अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधीत्व दिले जाण्याची शक्यता आहे.