एरव्ही रेल्वे रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांकडून बळाचा वापर करून तात्काळ हटविले जाते. पण भीमा-कोरेगावमधील दडपशाहीविरोधात मंगळवारी भीमशक्तीच्या झालेल्या उद्रेकादरम्यान पोलिसांनी रेल्वे रोकोवेळी पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली होती. मुंबईतील विविध उपनगरांमध्ये दिवस उजाडल्यानंतर दिसणाऱ्या रिक्षा आणि उघडलेली दुकाने आंदोलनकर्त्यांकडून बंद करण्यात येत होती. रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर सारा रोष व्यक्त केला जात होता. दलित समाजात उमटलेली मंगळवारची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता सावधता बाळगण्यावरच भर देण्यात आला होता.

रमाबाई आंबेडकरमध्ये १९९७ मध्ये झालेल्या पोलीस गोळीबारानंतर उमटलेली संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊनच बुधवारच्या बंदच्या वेळी बळाचा वापर करू नये वा संयम बाळगावा, अशा सक्त सूचना पोलिसांना देण्यात आल्याने मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमध्ये आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर हतबल झालेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिकाच घेणे पसंत केले, असे सूत्रांनी सांगितले.

नागरिकांमध्ये नाराजी

लहान-लहान मुले किंवा १० ते १५ जणांचा जमाव जमून दुकाने बंद करीत असल्याचे चित्र मुंबई आणि ठाण्यामध्ये पाहायला मिळत होते. पोलिसांसमक्षच आंदोलनकर्त्यांनी जरब बसवून दुकाने बंद केली  किंवा वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. काही ठिकाणी पोलिसांची वाहने रोखण्यात आली किंवा पोलिसांच्या वाहनांचा मार्ग रोखण्यात आला. सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी होती. वाहतूक कोंडीत अडकलेल्या किंवा रेल्वे रोकोचा फटका बसलेल्यांकडूनही पोलीस आणि शासनाच्या नावे खडे फोडले जात होते.

इतिहासातून बोध..

रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या पोलीस गोळीबाराच्या वेदना अजूनही दलित समाज विसरलेला नाही. तेव्हाही युतीचे सरकार सत्तेत होते आणि नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. प्रमोद महाजन यांचा १९९८च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच त्या निवडणुकीत राज्यात दलित समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळाली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरी बाळगिली. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यावर पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना परिस्थिती संयमाने हाताळण्याची सूचना केली होती. सरकारकडूनच संयमाने परिस्थिती हाताळण्याचे आदेश आल्याने पोलीस यंत्रणेचा नाईलाज झाला.

पोलीसच भयग्रस्त

सरकारमधील उच्चपदस्थांकडून आलेल्या आदेशामुळेच आमचा नाईलाज झाला. डोळ्यासमोर हिंसक घटना घडत असताना हातावर घडी घालून बसावे लागले, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली. सरकारने आदेश दिल्यानेच कारवाई करण्याचे टाळले. अन्यथा पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाईची भीती होती, अशी व्यथा एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.

‘बंद’च्या वेळी संयम बाळगावा वा बळाचा वापर करू नये, अशा सक्त सूचना पोलीस महासंचालक, सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना देण्यात आल्या होत्या. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. औरंगाबादमध्ये जमाव हिंसक झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला.  बंद शांततेत पार पडला असून, पोलिसांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.   – दीपक केसरकर , गृहराज्यमंत्री