मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; वॉटर कप स्पर्धेत यंदा ७५ तालुके

केवळ मोठय़ा धरणांतून महाराष्ट्र पाणीटंचाईतून मुक्त होणार नाही, तर जलयुक्त शिवार, वॉटर कपच्या माध्यमातून गावागावात होणाऱ्या जलसंधारणाच्या प्रकल्पांमधून राज्य २०१९ पर्यंत पाणीटंचाईतून मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेची घोषणा सह्य़ाद्री अतिथीगृहावरील कार्यक्रमात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. पानी फाऊंडेशनचे आमिर खान, किरण राव, रोहयो मंत्री जयप्रकाश रावल, या उपक्रमाला आर्थिक साह्य़ करणारे टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा व रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी, भारतीय जैन संघाचे शांतीलाल मुथा यांच्यासह या उपक्रमात सहभागी झालेले प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे, अभिनेत्री सई ताम्हणकर, आदी या वेळी उपस्थित होते. यंदा राज्यातील २४ जिल्ह्य़ांतील ७५ तालुक्यांमध्ये ८ एप्रिल ते २२ मे २०१८ या कालावधीत वॉटर कप स्पर्धा होणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांनी सांगितले.

लोकचळवळ झाली- टाटा

अमिर खानच्या प्रयत्नांमुळे जलसंधारणाची ही मोहीम लोकचळवळ झाली आहे. ती आता देशभर पोहोचावी, अशा शुभेच्छा रतन टाटा यांनी दिल्या. तर सबलीकरण व एकत्रीकरणातून समाज आपले प्रश्न कसे सोडवू शकतो, याचे वॉटर कप हे उत्तम उदाहरण असल्याचे कौतुक मुकेश अंबानी यांनी केले.

लोकांकडूनच प्रेरणा

आम्ही गावातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जायचो पण उलट त्यांचे कष्ट व समर्पण बघून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन यायचो, असे आमिर खानने मागील वॉटर कप स्पर्धेतील अनुभव सांगताना स्पष्ट केले.

रोहयोतून मजुरी

वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करावे लागते. अनेक गरीब कामगारांना इच्छा असते पण मजुरी बुडेल म्हणून तसे करता येत नाही व दुसऱ्या कामावर जावे लागते. त्यामुळे या योजनेत काम करणाऱ्यांना रोहयोतून मजुरी दिली जाईल, असे रोहयोमंत्री जयप्रकाश रावल यांनी जाहीर केले.