तब्बल ५५ वर्षांनंतर प्रथमच नोव्हेंबरात विधान भवनाच्या भिंतींना आज लवकर जाग आली. एरवी या दिवसात या भिंती सुस्त असायच्या. सारे काही नागपुरात असल्याने, त्या काहीशा सुस्तही असायच्या. १९६३ नंतर प्रथमच हिवाळी अधिवेशनाची लगबग पाहताना भिंती हरखून गेल्या. पावसाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने, बऱ्याच दिवसांनंतर इथे पुन्हा धांदल दिसू लागली होती. आज सकाळी सगळ्या भिंती नेहमीप्रमाणे एकमेकींच्या कानाशी लागल्या. एका भिंतीवर पहिल्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका लटकतच होती.. तिचे सामुदायिक वाचन झाले आणि नेहमीप्रमाणे सभागृहात आज काय होणार याचे अंदाज सुरू झाले. कामकाजाला सरावलेल्या या भिंतींचे आडाखे सहसा चुकत नसत.

‘आज सभागृहात दोन्ही बाजूंच्या विचारांची मेजवानी मिळणार!’.. सभागृहाची समोरची भिंत गंभीरपणाने म्हणाली. ती पुढे काय सांगते याकडे गोलाकार सभागृहाच्या साऱ्या भिंतींचे कान लागले होते..

कार्यक्रमपत्रिकेच्या शेवटच्या क्रमावरील विषयावर बोट ठेवत भिंत बोलू लागली. ‘आज अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील शोकप्रस्ताव आहे. त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेवर आहे’.. स्वतशीच बोलल्यासारखे ती भिंत बोलू लागली. तिचे डोळे लांबवर कुठेतरी लागले होते. अटलजींसोबत असलेल्या महाराष्ट्राच्या नात्याचे सारे पैलू तिच्या अनुभवी नजरेसमोरून बहुधा तरळत होते..

याच मुंबईतून अटलजींनी ‘कमल खिलेगा’.. अशी भविष्यवाणी वर्तविली होती. महाराष्ट्राच्या मातीत त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे नाते होते. इथल्या अनेक कार्यकर्त्यांनाही अटलजींनीच घडविले होते, आणि नेतेपदी पोहोचविले होते.. पुरणपोळी हे महाराष्ट्राच्या मराठी मातीचे खास वैशिष्टय़! अटलजींच्या खवय्येगिरीला याच पुरणपोळीची जणू चटक होती. दादरच्या ‘चंचल’मध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून जेवताना पुरणपोळीच्या स्वादाने अटलजींच्या काव्यप्रतिभेला आलेला बहर अनेक समकालीन नेत्यांनी अनुभवला होता. महाराष्ट्रातील लताच्या सुरांची त्यांच्या कविमनावर कमालीची मोहिनी होती.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा जिव्हाळा, शरद पवारांचे स्नेहसंबंध, अन्य राजकीय नेत्यांशी असलेले पक्षभेदविरहित नाते, शिवाजी पार्कच्या मैदानावर अटलजींनी गाजविलेल्या लाखोंच्या सभा आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने मंत्रमुग्ध होऊन त्या आठवणी जपणारा मुंबईकर श्रोतृसमुदाय.. बाळासाहेबांवरील चित्रमय चरित्रग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने ‘गेट वे’च्या साक्षीने मुंबईकरांना घडलेली अटलजींची ती अविस्मरणीय भेट.. अशा असंख्य आठवणी त्या भिंतीच्या मनात दाटून आल्या.. अटलजींच्या निधनाबद्दल मांडल्या जाणाऱ्या शोकप्रस्तावातून, महाराष्ट्राशी असलेल्या त्यांच्या हळव्या नात्याचे असे असंख्य पैलू त्यांचे अनुयायी मांडतील, आणि तेव्हा कदाचित आपले डोळे पाणावलेले असतील, असे वाटून त्या भिंतीने हळूच डोळ्याच्या कडा अगोदरच पुसून घेतल्या..

गप्पा संपल्या. साऱ्या भिंतीदेखील आजच्या दिवसाच्या कामकाजातील तो अखेरचा क्रम केव्हा येतो याकडे कान लावून सज्ज झाल्या. आज अटलजींच्या आठवणींनी सभागृहाच्या भावनांचा राजकारणापलीकडचा ओलावा अनुभवायला मिळणार असे त्यांना वाटत होते.

.. एका भिंतीवरच्या घडय़ाळाचे काटे ११ वाजण्याच्या दिशेने झुकू लागले. आवारात इशाऱ्याची घंटा खणखणू लागली, आणि सगळ्या भिंती सावरून बसल्या.

कामकाज सुरू झाले. अध्यादेश, शासकीय विधेयकांचे शासकीय कामकाज आटोपले, आणि शोकप्रस्तावांचा विषय पुकारला गेला. अवघ्या इमारतीच्या साऱ्या भिंतींचे कान आता कामकाजाकडे लागले होते. अटलजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला गेला.. भाषणे झाली, आणि सभागृहाचे कामकाज आटोपले. काहीशा अपेक्षाभंगाच्या नजरेनेच एकमेकींकडे पाहात भिंतींनीही आपले कान त्रयस्थपणे गुंडाळून घेतले. संध्याकाळनंतर सामसूम झाली, आणि रात्री पुन्हा भिंती गप्पा मारण्यासाठी एकत्र गोळा झाल्या.. मग गोलाकार सभागृहाची समोरची भिंतच अटलजींच्या त्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ लागली, अन् त्या ऐकता ऐकता, साऱ्या भिंती हळव्या झाल्या!