महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या तीन मूलतत्त्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितले.
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी  काही सनातनी वृत्तीच्या संघटनांवर संशय घेतला जात आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील तीन मूलतत्त्ववादी संघटनांवरील बंदीच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले आहे. मात्र, या तीन संघटनांची नावे सांगणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची तुलना महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांशी करत मुख्यमंत्र्यांनी या प्रवृत्तींवर टीका केली.  
तर दुसरीकडे दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पोलिस सर्व दिशांनी तपास करत आहेत. एकाच संघटनेबाबत तपास सुरू नाही. त्यामुळे तपासातून वस्तुस्थिती पुढे आल्यानंतरच या हत्येमागे कोण आहे याचा उलगडा होईल, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.