संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : राज्यात करोनाची साथ पसरू नये यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला करोनाबाधितांची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भविष्यात अशा समस्येचा मुकाबला करण्यासाठी ५०० खाटांचे अत्याधुनिक साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आरोग्य विभागाने तयार केली आहे.

सद्यस्थितीत राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये  ६०० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. करोनाच्या चाचणीसाठी उद्यापासून तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार असून, एकूण आठ ठिकाणी प्रयोगशाळा सुरू केल्या जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील वेगवेगळ्या साथरोग आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी ‘रिअल टाइम डाटा’ गोळा करून तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा अलीकडेच आरोग्य विभागाने तयार केली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसह तब्बल ३३ प्रकारच्या आजारांना तात्काळ अटकाव करता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी व्यक्त केला.

करोनाचा मुकाबला ही सर्वस्वी वेगळी बाब असून यासाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र रुग्णालय असणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आले. याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही करण्यात आली. त्यानुसार पुणे औंध येथे ५०० खाटांचे साथरोग नियंत्रण रुग्णालय उभारण्याची योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, नियंत्रण कक्ष, संसर्गजन्य आजारांचा तसेच नव्याने उद्भवणाऱ्या साथ रोगांचा सामना करण्यासाठी विशेष पथक निर्माण केले जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.