डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले लंडनमधील निवासस्थान खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने आता वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. घरमालकाने सोमवापर्यंतची अंतिम मुदत दिल्याने आज सकाळपासूनच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आणि लंडनमधील भारतीय उच्च आयुक्ताशी संपर्क साधून दोन-तीन दिवसांत खरेदी करार करण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने घरमालकाला कळविण्यात आले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत खरेदी करार होऊन ४ सप्टेंबपर्यंत घराचा ताबा घेण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
या वर्षांच्या सुरुवातीलाच लंडनमधील आंबेडकर निवास खरेदी करून त्याचे आंतराष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा विषय राज्य सरकारपुढे आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घर खरेदीची पुढील प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेत केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज्य आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रंजन मथाई, उपउच्चायुक्त विरंदर पॉल, सचिव प्रितम लाल व एम. पी. सिंग यांना सहभागी करून घेण्यात आले. घराची किंमत निश्चित करण्यासाठी दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली. एप्रिलपर्यंत ही सारी प्रक्रिया पूर्ण
झाली.  दरम्यानच्या काळात राज्य सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद केली, परंतु त्यानंतर निधी वितरणाबाबत वित्त विभागाने तांत्रिक अडचण निर्माण केल्यामुळे पुढील प्रक्रिया थंडावल्याची बडोले यांची तक्रार होती, परंतु हा प्रश्न आता निकाली निघेल असे या अधिकाऱ्याने सांगितले.
राज्य सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे घरमालकाने २० ऑगस्टला पत्र पाठवून वास्तू खरेदीबाबतचा अंतिम निर्णय कळविण्यासाठी राज्य सरकारला सोमवापर्यंतची मुदत दिली. त्यानंतर मात्र सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या. सामाजिक न्यायमंत्री बडोले आज दिवसभर दिल्लीत तळ ठोकून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयशी संपर्क साधून होते.
राज्य सरकारच्या वतीने येत्या २६ किंवा २७ ऑगस्टला घर खरेदीचा करार केला जाईल आणि ४ सप्टेंबपर्यंत उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उच्चायुक्तालयामार्फत घरमालकाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान खरेदी करण्यास सरकार मुद्दाम विलंब करीत आहे, असा आरोप करीत व सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मंत्रालयातील सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर हंगामा केला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व अचानकपणे सुरू झालेला गोंधळ थांबला.