News Flash

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून दहा रुग्णालयांच्या सेवेला स्थगिती

कोल्हापूरमधील तपासणी मोहिमेत ३४ रुग्णालयांची झाडाझडती

( संग्रहीत छायाचित्र )

|| शैलजा तिवले

कोल्हापूरमधील तपासणी मोहिमेत ३४ रुग्णालयांची झाडाझडती; रुग्णांकडून पैसे उकळणे, उपचार नाकारल्याने कारवाई

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांकडून पैसे उकळणे, उपचार नाकारणे आणि जादा देयक आकारून रुग्णांची लुबाडणूक करणे या गुन्ह्य़ांखाली दोषी आढळलेल्या कोल्हापुरातील दहा रुग्णालयांची सेवा या योजनेतून स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोल्हापुरातील ३४ रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेमध्ये ही रुग्णालये दोषी आढळून आली.

महात्मा फुले योजनेच्या राज्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांचे  पथक कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता या पथकाने कोल्हापूर शहरासह गडिहग्लज, इचलकरंजी, कोडोली येथील ३४ रुग्णालयांमध्ये तपासणी मोहीम सुरू केली.

यातील काही रुग्णालयांनी एकीकडे उपचार केल्याचे दावे सरकारकडे सादर करून त्याची वसुली केलीच आहे. मात्र दुसरीकडे रुग्णांकडूनही औषधांच्या आणि भेट देणाऱ्या डॉक्टरांचे शुल्क याखाली पैसे उकळले आहेत. यामुळे रुग्णांना तब्बल ५० ते ६० हजार रुपयांचा भुर्दंड बसल्याचे तपासणीमधून निदर्शनास आले. तसेच काही रुग्णालयांनी रुग्णांना योजनेअंतर्गत दाखल करूनही मोफत उपचार देण्यास टाळाटाळ केल्याचेही रुग्णांशी केलेल्या प्रत्यक्ष चर्चेमधून समोर आले.

रुग्णालयांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही मोहीम आखण्यात आली. राज्यभरात अशी मोहीम सुरूच असून ३४ पैकी तब्बल १० रुग्णालये विविध गुन्ह्य़ांखाली दोषी आढळली आहेत. या रुग्णालयांची सेवा या योजनेत स्थगित करण्यात आली असून त्यांना नोटीसही पाठविण्यात आली आहे. नोटिशीला दिलेल्या उत्तरावरून पुढील कारवाई करण्यात येईल.      -डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले योजना राज्य हमी सोसायटी    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 1:34 am

Web Title: mahatma jyotiba phule jan arogya yojana 4
Next Stories
1 हजारो भाविकांच्या साक्षीने ललितापंचमीचा सोहळा
2 सांगलीतील दुष्काळी तालुक्यांची सुभाष देशमुख यांच्याकडून पाहणी
3 शासनाच्या मदतीनंतरही सूतगिरण्यांचा धागा उसविलेलाच
Just Now!
X