संदीप आचार्य 
मुंबई: लाखो गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करोना काळात आतापर्यंत तब्बल एक लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात करोनाच्या हजारो रुग्णांसह कॅन्सर, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या रुग्णांचा प्रामुख्याने समावेश असून यासाठी तब्बल ३५० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त ९९६ आजारांवर उपचार केले जातात तर पंतप्रधान जीवनदायी योजनेतून १२०९ आजारांवर उपचार होतात. या योजनेचा लाभा राज्यातील जवळपास ८५ टक्के लोकांना होऊ शकतो. याशिवाय महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात उपचार घेणार्यांना काही विशिष्ट आजारांसाठी लाभ मिळत होता. या योजनेचे प्रमुख असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी अलीकडेच नव्याने निविदा काढतांना ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घेतात असे आजार काढून या योजनेत नवीन आजारांचा समावेश केला आहे. परिणामी जास्तीतजास्त रुग्णांना उपचारांचा लाभ घेता येईल.

मागील काळात या योजनेत सुमारे साडेचारशे रुग्णालयांचाच केवळ समावेश होता. ही व्याप्ती वाढवून आज एक हजार रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात गुडघे बदल शस्त्रक्रियेसह १२० प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची योजना डॉ. सुधाकर शिंदे यांनी लागू केली. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत असून राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने २३ मे रोजी या योजनेची व्याप्ती नव्याने वाढवली. या योजनेत आता राज्यातील सर्वांचाच समावेश करण्यात आल्याने १२ कोटी लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. पांढरी शिधापत्रिका असलेल्या लोकांनाही २३ मे रोजी काढलेल्या शासन आदेशामुळे एक हजार रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार असून ३१ जुलैपर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. जुलैमध्ये पुन्हा या योजनेचा आढावा घेऊन आणखी मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मार्चपासून २६ जूनपर्यंतच्या करोना काळात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून तब्बल एक लाख ४१ हजार ५७८ रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. यात करोनाच्या सुमारे नऊ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले तर कर्करोगाच्या ४७,६६७ रुग्णांवर उपचार केले गेले. कर्करुग्णांमध्ये

३८,३९० रुग्णांवर केमोथेरपी करण्यात आली तर ५५८१ रुग्णांना रेडिओ थेरपी उपचार केले गेले. याशिवाय ३६९६ कर्करुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. करोना काळात शासकीय तसेच बहुतेक खाजगी रुग्णालयांनी सामान्य रुग्णांना उपचार नाकारले जात होते. अशावेळी कॅन्सर रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. करोनाच्या भीतीपोटी बहुतेक रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या रुग्णालयातून ४७ हजार कर्करुग्णांवर झालेले उपचार ही मोठी कामगिरी असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. किडीनी विकाराच्या रुग्णांना ३१,३०५ वेळा डायलिसिस केले गेले. याशिवाय २,३१५ रुग्णांच्या ह्रदयशस्रक्रिया करण्यात आल्या तर १६,७१७ रुग्णांच्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी आदी हृदयोपचार करण्यात आले.

हजारो लोक (१५५३८८) या क्रमांकावर दूरध्वनी क्रमांकावर फोन करून या योजनेचा लाभ घेत आहेत. एक मार्चपासून आतापर्यंत केलेल्या रुग्णांवरील उपचारापोटी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या योजनेतील एक हजार रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून पीपीइ किट देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. करोनाच्या काळात बहुतेक नर्सिंग होम्स तसेच खाजगी दवाखाने डॉक्टरांनी बंद ठेवले असताना आमच्या योजनेतील बहुतेक रुग्णालयांनी रुग्णसेवेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला व याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्करुग्णांना मिळाल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.