मुंबई : बुरशीजन्य आजारांच्या उपचारासाठी कान,नाक,घसा तज्ज्ञांसह नेत्र, मेंदू इत्यादी तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे असे सर्व विभाग असलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्येच या रुग्णांवर उपचार शक्य आहे. महात्मा फुले योजनेत एक हजार रुग्णालये समाविष्ट असली तरी यातील खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. अशी रुग्णालये राज्यात जवळपास १०० आहेत. त्यामुळे याच रुग्णालयांमध्ये रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

करोना उपचारांत योजनेची मर्यादा संपली असली तरीही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

मुंबईत या आजाराचे ११३ रुग्ण आहेत. त्याची  औषधे खरेदी करण्याच्या निविदा पालिकेने जाहीर केल्या आहेत. औषधे लवकरच उपलब्ध होतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.