महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व नेत्यांमुळेच राज्यात करोना वाढला असल्याचा आरोप करीत भाजप नेतेी गिरीश महाजन यांनी शिवजयंती साजरी करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारने या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय सभा, समारंभ, मिरवणुका, मोर्चे आदींवर बंदी घातली आहे. करोनाचे संकट वाढत असताना अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे सांगून महाजन म्हणाले,  ठाकरे यांचे हे निर्बंध म्हणजे ‘ लोका सांगे ब्रम्हज्ञान’ असे आहे. सरकारमधील मंत्री व नेते जयंत पाटील, नाना पटोले व इतरांनी गेल्या काही दिवसांमध्ये यात्रा, मोर्चे, सभा आयोजित केल्या होत्या.

राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी गोळा करण्यावर शिवसेनेने टीका केली आहे. मात्र मुंबईतील फेरीवाले, विक्रेते यांच्याकडून शिवसेना नेतेच मुख्यमंत्र्यांचे व नेत्यांचे फोटो असलेल्या पावत्या देऊन खंडणी वसूल करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

भाजपचे आंदोलन स्थगित

वीज ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे बुधवारी रोजी होणारे जेल भरो आंदोलन करोना वाढत असल्याने स्थगित करण्यात आल्याची  माहिती प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा

पुणे : हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात असलेल्या एका लॉनमध्ये करोना काळात शाही विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याप्रकरणी कोल्हापुरातील भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात पोलिसांनी  गुन्हा दाखल केला. महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. सोहळ्यास वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती.