राज्यात २० टक्के वीजदरवाढ लागू झाली असताना आता ‘महावितरण’ने सुमारे ५९०५ कोटी रुपयांचा दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगात दाखल केला आहे. त्यामुळे विजेचे दर १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ या कंपन्यांच्या नफ्याचे ३८८८ कोटी रुपये या दरवाढीतून वगळण्याची मागणी ‘महावितरण’ने केली असून ती मान्य होणार का, याबाबत उत्सुकता आहे.
‘महावितरण’चा वीजदरवाढीचा प्रस्ताव ५९०५ कोटी रुपयांचा आहे. पण हा आकडा लपवण्यासाठी ‘महानिर्मिती’चा ९४५ कोटी रुपयांचा आणि ‘महापारेषण’चा २९४३ कोटी रुपयांचा नफा वजा करता दरवाढीचा प्रस्ताव २०१७ कोटी रुपयांचाच असल्याचा दावा करत आहेत. ही चलाखी आहे. अशारितीने नफा वर्ग करण्याची परवानगी कोणी दिली आहे, असा सवाल वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला.

वीजमागणीत घट
राज्यातील थंडीचा परिणाम विजेच्या मागणीवरही झाला आहे. एरवी दिवसा विजेची मागणी १३ ते १४ हजार मेगावॉट असते. ती ११ ते १२ हजार मेगावॉटपर्यंत घसरली आहे. तर रात्रीची वीजमागणीही घटली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री ‘महावितरण’ने केंद्रीय कोटय़ातून सुमारे १५०० मेगावॉट कमी वीज घेतली. शिवाय एक हजार मेगावॉट वीज ग्रिडमध्ये टाकली. कोटय़ापेक्षा कमी वीज वापरल्याबद्दल महाराष्ट्राला प्रति युनिट सुमारे एक रुपयांचा दंड बसला आहे.