22 February 2019

News Flash

विजेचा खिशाला धक्का?

महावितरणचा ३०,८४२ कोटींचा दरवाढ प्रस्ताव

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महावितरणचा ३०,८४२ कोटींचा दरवाढ प्रस्ताव

राज्यातील अडीच कोटी वीजग्राहकांवर पुढील दोन वर्षांत ३० हजार ८४२ कोटी रुपयांची वीज दरवाढ लागू करण्याची मागणी महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्तावाद्वारे केली आहे. सामान्य घरगुती ग्राहकांच्या वीजदरात ५ ते सहा टक्के वाढ आणि स्थिर आकार ६५ रुपयांवरून वीजवापरानुसार थेट १४० ते २२० रुपये करण्याचा म्हणजेच ११५ ते २३८ टक्के वाढवण्याची मागणी करत महावितरणने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. त्याचबरोबर २०१५-१६ पासून मार्च २०१८ अखेर प्रलंबित वसुलीपोटी वीजग्राहकांवर तब्बल ३८८० कोटी रुपयांच्या व्याजाचा भरुदड पडणार आहे.

मुंबईतील उपनगरांसह राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील प्रत्यक्ष ताळेबंदातील फरकापोटी १२ हजार २५० कोटी रुपये, व्याजापोटी ३८८० कोटी रुपये वसूल करण्याचा महावितरणचा प्रस्ताव आहे. याशिवाय २०१७ ते मार्च २०१९ पर्यंत होणाऱ्या खर्चाच्या वसुलीसाठी बाकीची १६ हजार १३० कोटी रुपये महावितरणने मागितली आहे. त्याचबरोबर १५ पैसे ते ८३ पैसे वहन आकार लावण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. यावर्षी राज्यात १४.५६ टक्के वीजहानी राहील, असा अंदाज आहे.

वीजग्राहकांकडून घेण्यात येणाऱ्या स्थिर आकारात मोठी वाढ सुचवण्यात आली आहे. सध्या घरगुती ग्राहकांना सरसकट ६५ रुपये स्थिर आकार लागू आहे. आता तो दरमहाच्या वीजवापरानुसार लागू करण्याचा प्रस्ताव आहे. १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना १४० रुपये (११५ टक्के वाढ), १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना १७० रुपये (१६२ टक्के वाढ), ३०१ ते ५०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना १९० रुपये (१९२ टक्के वाढ), ५०१ ते १००० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना २०५ रुपये (२१५ टक्के वाढ) आणि दरमहा एक हजार युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना २२० रुपये (२३८ टक्के वाढ) स्थिर आकार लागू करावी, अशी मागणी महावितरणने केली आहे. त्याचबरोबर औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांच्या स्थिर आकारातही १०९ ते २३३ टक्के वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

औद्योगिक ग्राहकांसाठीचा वीजदर ६.९८ रुपये प्रति युनिट असून तो ७.०९ रुपये करण्याचे, वाणिज्यिक ग्राहकांचा दर ११.४५ रुपयांवरून ११.५६ रुपये आणि मेट्रो व मोनोरेलचा वीजदर ५.८० रुपयांवरून ५.९१ रुपये करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर या गटांमध्ये नव्याने वीजजोडणी घेणाऱ्या ग्राहकांना सवलतीचा दर देण्यात येणार असून सध्याच्या ग्राहकांना वाढीव वापरावर सवलत देण्यात येणार आहे.

यंत्रमागांच्या वीजदरात २ टक्के वाढ, ग्रामीण भागातील पथदिव्यांना १८ टक्के तर महापालिका क्षेत्रात पथदिव्यांना १७ टक्के दरवाढ, स्मशानभूमीच्या वीजदरात २१ टक्के वाढ मागण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये व रुग्णालयांच्या वीजदरात १२ ते २० टक्के वाढ करण्याची मागणी महावितरणने केली आहे.

घरगुती ग्राहकांना..

सामान्य घरगुती ग्राहकांना दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापरासाठी वीजदरात कसलीही दरवाढ न करता दिलासा दिला आहे. दरमहा १०१ ते ३०० युनिटपर्यंतचा सध्याचा दर ६.८१ रुपये प्रति युनिट असून तो ७.१९ रुपये(६ टक्के वाढ), ३०१ ते ५०० युनिटपर्यंतचा दर ९.७६ वरून १०.२६ रुपये (५ टक्के वाढ), ५०१ ते १००० युनिटपर्यंतचा दर ११.२५ रुपयांवरून ११.८१ रुपये (५ टक्के वाढ), एक हजार युनिटपेक्षा अधिक वीजवापरणाऱ्यांचा दर १२.५३ रुपयांवरून १३.१४ रुपये (५ टक्के) करण्याचा महावितरणाचा प्रस्ताव आहे. हे वीजदर लागू झाल्यानंतर मार्च २०१९ पर्यंत लागू राहावेत, असे महावितरणने म्हटले आहे.

कृषीपंपांसाठी..

राज्यातील मीटरवरील कृषीपंपांचा वीजदर ३.४४ रुपये प्रति युनिटवरून ४.२४ रुपये (२३ टक्के वाढ) करण्याची मागणी महावितरणने केली आहे. त्याचबरोबर अश्वशक्तीवरील वीजपंपांचे दर ३४ ते ३६ टक्के वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

First Published on July 12, 2018 1:06 am

Web Title: mahavitaran bill electricity