महावितरणच्या १ हजार मेगावॉटच्या सौरऊर्जा खरेदीत सर्वात कमी दर

मुंबई : 

अपारंपरिक विजेला प्रोत्साहन देण्यासाठी सौरऊर्जेला गेल्या काही चालना देण्यात आल्यापासून एकेकाळी सर्वात महाग असलेली सौरऊर्जा आता सर्वात स्वस्त ठरत आहे. महावितरणने एक हजार मेगावॉट सौरऊर्जा खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेत अवघ्या दोन रुपये ७१ पैशांचा प्रति युनिट दर मिळाला असून हा या वर्षांतील सर्वात कमी दर ठरला आहे.

राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार वीज वितरण कंपनीला अपारंपरिक ऊर्जा खरेदीच्या बंधनाची पूर्तता करण्यासाठी काही ठरावीक प्रमाणात सौरऊर्जा घ्यावी लागते. त्यानुसार एक हजार मेगावॉट सौरऊर्जा दीर्घकालीन खरेदी कराराद्वारे विकत घेण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. १४ मे २०१८ रोजी ही ऑनलाइन निविदा प्रक्रिया पार पडली. यात आठ कंपन्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची एकूण क्षमता १४५० मेगावॉट होती.

या निविदा प्रक्रियेत एक हजार मेगावॉट सौरऊर्जा पुरवण्यासाठी मे. जेएलटीएम एनर्जी (२० मेगावॉट), मे. जेएलटीएम एनर्जी (२० मेगावॉट) व मे. माहोबा सोलार प्रा. लि. (२०० मेगावॉट) या कंपन्यांनी २ रुपये ७१ पैसे प्रति युनिट इतक्या कमी दरात सौरऊर्जा देण्याची तयारी दर्शवली. तर मे. रिन्यू सोलार पॉवर प्रा. लि.(२५० मेगावॉट) मे. अ‍ॅक्मे सोलार होल्डिंग्स लि.,(२५० मेगावॉट) मे. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि. (१५० मेगावॉट) आणि मे. अजुरे पॉवर (इंडिया) प्रा. लि. (१५० मेगावॉट) यांनी २ रुपये ७२ पैसे प्रति युनिट इतकी बोली लावली होती.

या वीजखरेदी प्रकियेत प्राप्त झालेला न्यूनतम दर हा या वर्षांत मे. एनटीपीसीने व देशातील इतर राज्यांनी काढलेल्या निविदांमध्ये न्यूनतम दर ठरला आहे.