महायुतीतील अन्य चार मित्रपक्षांसाठी किती व कोणत्या जागा सोडायच्या, याचा निर्णय घेऊन त्यानंतर भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फारशा अधिक जागा देण्याची शिवसेनेची तयारी नसून जागावाटपाचे पूर्वीचेच सूत्र कायम ठेवण्यावर शिवसेना ठाम आहे. मात्र भाजपने, महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले असून महायुतीची एकत्रित बैठक २८ जुलै रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जागा वाढवून घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता कमी आहे.
महायुतीच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता जागावाटपाची बोलणी सुरू केली आहेत. पंचतारांकित सूफी टेल हॉटेलमध्ये भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेची पहिली फेरी शुक्रवारी पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत सर्वच्या सर्व २८८ जागांचा आढावा घेण्यात आला. रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटना यांची काही मतदारसंघात ताकद असून त्यांची नेमकी मागणी किती व कोणत्या जागांची आहे, याचा अंदाज घेण्याचे युतीच्या नेत्यांनी ठरविले आहे. त्या जागेवर दावा करणाऱ्या पक्षाची ताकद किती आहे, त्यापूर्वी तेथे निवडणूक लढविली होती का, तो निवडून येण्याची शक्यता आहे का, याचा विचार करून जागा देण्याचा निर्णय होईल.
मात्र मित्रपक्षांना द्यावयाच्या जागा शिवसेना व भाजप यांच्या कोटय़ातून समान पध्दतीनेच दिल्या जातील. लोकसभेसाठी दोघांनी प्रत्येकी दोन जागा दिल्या. त्याच धर्तीवर भाजप-शिवसेनेने  मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्यात, असा शिवसेनेचा आग्रह आहे.  प्राथमिक फेरीतून केवळ एक पाऊल पुढे गेले असून पुढील बैठकांमध्येही एकमेकांचा अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू राहिल.
राखीव जागांवर रिपाइंची भिस्त
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात ३० ते ३५ मतदारसंघ मिळावेत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मात्र एवढय़ा जागा मिळणे अशक्य आहे, याची जाणीव असल्याने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जास्तीत-जास्त जागा मिळाव्यात, असाही नेत्यांचा प्रयत्न असल्याचे समजते.  महायुतीतील शिवसेना व भाजप या प्रमुख दोन पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शुक्रवारी पहिली बैठक झाली. २८ जुलैला महायुतीच्या इतर घटक पक्षांबरोबर एकत्र बैठक आहे. त्यावेळी जागावाटपावर चर्चा होईल, असा अंदाज आहे. अनुसूचित जातीसाठीच्या राखीव जागांपैकी १५ ते १८ जागा मिळाव्यात अशी रिपब्लिक पक्षाची मागणी आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची १२ ऑगस्टला दिल्लीत बैठक आहे. त्यात रणनिती ठरविली जाणार आहे, असे पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले.