बदलीसाठी दोन कोटी रुपयांची लाच देताना सीबीआयच्या हाती लागलेला पश्चिम रेल्वेचा माजी महाव्यवस्थापक महेशकुमारचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा निरीक्षक खास तैनातीमध्ये होता. यश मिश्रा नावाच्या या निरीक्षकाला आर्थिक घोटाळ्यातून वाचवून आपल्या दिमतीला आणण्यासाठी महेशकुमारने आपले वजन त्यावेळी रेल्वे मंत्रालयात वापरले होते आणि त्यातूनच महेशकुमारला आपल्या बढती आणि प्रगतीचा मार्ग गवसल्याचे स्पष्ट होत आहे.
रेल्वे पोलीस दलामध्ये मुंबई सेंट्रल येथे निरीक्षक असलेल्या यश मिश्रा याची आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये केंद्रीय गुप्तचर विभागाने २००९ मध्ये चौकशी केली होती. त्यावेळी कारवाई म्हणून मिश्रा याला चर्चगेटला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागात हलविण्यात आले होते. त्याचवेळी तो महेशकुमारच्या संपर्कात आला. महेशकुमार आणि ‘सेक्स रॅकेट’चा सूत्रधार बाबूलाल वर्मा यांचे संबंध जुळण्यातही मिश्राचा महत्त्वाचा सहभाग होता. महेशकुमारचा तो जणू ‘आर्थिक ब्रेन’ समजला जात होता.
मिश्राप्रमाणेच स्वामी नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख महेशकुमारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आला आहे. स्वामी म्हणजेच मिश्रा की आणखी कोण वेगळी व्यक्ती आहे, याचा तपास करण्यात येत आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर बाबूलाल वर्मा प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येणार असून पश्चिम रेल्वेतील एका प्रमुख अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

रेल्वेमार्गालगतच्या झोपडय़ांचा ‘त्राता’!
पश्चिम रेल्वे मार्गालगत असलेल्या अनधिकृत झोपडय़ांना महेशकुमारनेच आपल्या अधिकारामध्ये संरक्षण दिले होते. दोन वेळा त्याने झोपडय़ांवरील कारवाई रद्द केली होती. कारवाईची माहिती मिळताच महेशकुमार मिश्राच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई रद्द करण्यास भाग पाडत असे. या प्रकरणांमध्ये त्याचे काही राजकीय नेत्यांशीही जवळकीचे संबंध निर्माण झाले होते, असे बोलले जात आहे.