मुंबईतील चौपाटी पर्यटनाचे महत्त्व आता स्थानिकांनी ओळखले असून माहीम चौपाटीच्या स्वच्छतेसाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. या माहीम चौपाटीसाठी स्थानिकांचा सहभाग असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेषत: या भागातील स्थानिक एका स्थानिक अभिनेत्रीनेही सहभाग नोंदवला आहे.
माहीम चौपाटीवर कायम स्वच्छता व चांगले सुशोभीकरण करण्यात यावे ही मागणी गेले काही महिने जोर धरत होती. अखेर ही स्वच्छता करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे ठरवत एका चौपाटी सुधार समितीची स्थापना केली. या समितीत प्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता व मृणाल जोग सवेरा को-ऑप सोसायटीचे सदस्य अब्दुल सत्तार, शम्स मंजिलचे सदस्य अन्वर खान, ली पटेल इत्यादींचा समावेश आहे. या समितीने केलेली माहीम चौपाटीवर ४० फ्लड लाईट्स लावण्याची मागणी पालिका प्रशासनाने मान्य केली आहे. तसेच चौपाटीचे पाणी थोपवण्यासाठी ट्रायपॉड्स टाकण्यात येणार आहेत. या चौपाटीवरील समुद्रात नाल्यातील घाण पाणी येत असल्याने ते रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन साहाय्यक आयुक्तांनी दिले आहे. तसेच कंत्राटदारांकडून नाल्यातील गाळ काढण्यासाठी अतिरिक्त कामगार लावले जाणार आहेत.