|| अमर सदाशिव शैला

कंदीलनिर्मिती ५० टक्क्यांवर; करोनामुळे व्यवसायाला फटका

मुंबई : करोना आणि टाळेबंदीमुळे सर्व बाजारपेठांमध्ये नैराश्याचे वातावरण असताना त्याचे सावट माहीममध्ये पिढ्यान्पिढ्या हाताने पारंपरिक कागदी आकाश कंदील घडवणा ऱ्या कंदील गल्लीतील कुटुंबीयांवरही आहे. दरवर्षी आकाश कंदिलांच्या कामाची धांदल असलेल्या या घरांमध्ये फारसा उत्साह नाही. करोनामुळे व्यवसायाला फटका बसण्याच्या भीतीने बहुतांश कुटुंबांनी कंदिलाचे काम निम्म्याने कमी के ले आहे.

माहीम येथील सिटी लाईट सिनेमाजवळ कंदील गल्ली परिसरात २५ ते ३० घरांमध्ये हाताने कागदाचे कंदील बनविण्याचा काम गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. बहुतांश घरांमध्ये रक्षाबंधनापासून आकाश कंदील बनविण्याचे काम सुरू होते. यंदा टाळेबंदीमुळे बाजारपेठा सुरू होण्याबाबत शंका असल्याने उत्पादकांनी आकाश कंदिलांची निर्मिती उशिरा सुरू केली. बहुतांश उत्पादकांनी सप्टेंबरपर्यंत काम सुरू केले नाही. आता कंदील बनविण्याचे काम सुरू झाले असले, तरी यंदा करोनामुळे ग्राहकांकडून खरेदी होईल का याबाबत साशंकता आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के च कंदील बनविण्याचे ठरविले आहे.

इथल्या कं दिलांना कार्यालयांकडून मागणी असते, मात्र बहुतांश कार्यालये बंद असल्याने यंदा दरवर्षीप्रमाणे दिवाळीचा उत्साह असेलच असे नाही. दिवाळीच्या महिनाभर आधीच कार्यालयांकडून बुकिंग होते. परंतु यंदा त्या फारशा नाहीत. त्यातच वसई, विरार, पालघर आदी भागांतून खरेदीसाठी येणाऱ्यांकडूनही फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. परिणामी तयार कंदील विक्रीविना पडून राहण्याची भीती व्यावसायिकांना आहे. हे सर्व व्यावसायिक दिवाळीच्या आधी चार दिवस एल. जे. मार्गावर पदपथावर विक्री करतात. ‘४० वर्षांपासून कंदील बनविण्याचे काम करतो आहे. दरवर्षी बँका आणि खासगी आस्थापनांकडून आगाऊ मागणी होते. एका वेळेस हजार एक कं दील घेणारे आहेत. पण यंदा एकही आगाऊ नोंदणी नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के च कंदील बनविले आहेत. आता स्टॉलवर होणाऱ्या विक्रीवर सर्व मदार आहे,’ असे लक्ष्मण पोखरे यांनी सांगितले. तर सतीश झाटिये ५० वर्षांपासून कंदील घडवत आहेत. ‘नोकरी सांभाळून दरवर्षी आकाश कंदील तयार करतो. दरवर्षी मोठ्या आकाराचे २०० कंदील, तर छोट्या आकाराचे एक हजार कंदील बनवितो. यंदा मोठ्या आकाराचे १०० आणि लहान ६०० कंदीलच बनविणार आहे,’ असे सतीश यांनी सांगितले.

परंपरेत खंड

संजय कांबळे हे सध्या कंदील बनविणा ऱ्या खोलीची साफसफाई करत आहेत. करोनामुळे बाजारात खरेदीसाठी किती ग्राहक येतील याची शाश्वती नसल्याने त्यांच्या परंपरेत यंदा खंड पडला आहे. ‘कंदील तयार केले आणि बाजारात ग्राहकच फिरकले नाहीत तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे यंदा आकाश कंदील बनविण्याऐवजी दक्षिण मुंबईतील बाजारातून तयार कंदील आणून त्यांची विक्री करणार आहे,’ असे कांबळे यांनी सांगितले.