06 August 2020

News Flash

माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांचा स्थलांतराला नकार

मुंबई महापालिके च्या वस्त्यांलगतच्या शाळांमध्ये तेथील रहिवाशांची व्यवस्था करण्यात येत होती.

संग्रहित छायाचित्र

मुंबई :  ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट समोर उभे ठाकलेले असताना करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांनी स्थलांतर करण्यास स्पष्ट नकार दिला. पालिकेच्या एका शाळेतील १६ वर्ग खोल्यांमध्ये व्यवस्था केल्याचे समजताच माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांनी तेथे न जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबईमध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माहीम कोळीवाडय़ामध्ये कडकडीत संचारबंदी पाळण्यात आली होती. रहिवाशांनी कटाक्षाने घराबाहेर पडणे टाळले होते. मुंबईच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने किनाऱ्यालगतचे कोळीवाडे आणि वस्त्यांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी रात्रीपासून नागरिकांना स्थलांतरित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मुंबई महापालिके च्या वस्त्यांलगतच्या शाळांमध्ये तेथील रहिवाशांची व्यवस्था करण्यात येत होती. ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका जसा वाढू लागला तसे किनाऱ्यालगतच्या वस्त्यांमधील रहिवाशांचे युद्धपातळीवर सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे काम पालिका अधिकाऱ्यांनी हाती घेतले.

माहीम कोळीवाडा परिसरातील स्थानिक नगरसेवक, तसेच पालिकेच्या विभाग कार्यालयाने रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत असल्याची सूचना केली. मात्र या कोळीवाडय़ातील रहिवाशांनी स्थलांतरित होण्यास स्पष्ट नकार दिला. माहीम कोळीवाडय़ाचा भाग असलेला रेतीबंदर, स्केप, मोरी रोड,  बाजार आणि फिशरमन कॉलनी परिसरातील रहिवाशांना जवळच्याच पालिका शाळेत स्थलांतरित करण्यात येणार होते. या परिसरात साधारण २५०० घरे असून तेथील लोकसंख्या १० ते १२ हजाराच्या आसपास आहे. पालिका शाळेत मोठय़ा संख्येने स्थलांतरितांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मुंबईत करोनाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. स्थलांतरितांची मोठी गर्दी होऊन करोनाची बाधा होण्याचा धोका मोठा आहे. ही बाब लक्षात घेऊन माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांनी स्थलांतरास नकार दिला, अशी माहिती येथील रहिवाशी भूषण निजाई यांनी  दिली. मासेमारीसाठी गेल्यानंतर खवळलेल्या समुद्राचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोळीवाडय़ाला समुद्राचे उधाण नवे नाही. गर्दीमुळे करोनाची बाधा होऊ नये यासाठी कोळीवाडय़ातच राहणे पसंत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 1:49 am

Web Title: mahim koliwada residents refuse to shift ahead of nisarga cyclone zws 70
Next Stories
1 मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू
2 अजूनही कारागृहांमध्ये २८ हजार कैदी
3 आरोग्य केंद्रांची माहिती एका क्लिकवर
Just Now!
X