४० गाडय़ा रद्द, वडोदरा एक्स्प्रेसच्या प्रवाशांची तब्बल १३ तासांनतर सुटका

मुंबई : शहर आणि उपनगरांत मंगळवारी कोसळलेल्या पावसाने लांब पल्ल्याच्या गाडय़ांतील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ४० गाडय़ा रद्द झाल्या तसेच विविध स्थानकांत खोळंबलेल्या लांब पल्ल्याच्या २३ गाडय़ा तेथूनच माघारी वळविल्या गेल्या. तर लोहमार्गाचा जलमार्ग झाल्याने रखडलेल्या वडोदरा एक्स्प्रेसमध्ये पहाटे चारपासून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यास रेल्वेला तब्बल १३ तास लागले! या दिरंगाईवरूनही रेल्वेवर टीका होत आहे.

नालासोपारा स्थानकातील सर्व मार्गावर ४१५ मिमी ते ६०५ मिमीपर्यंत पाणी साचले होते. विरार, वसई स्थानकांतही पाणी होते. त्यामुळे सकाळी साडेसातपासून पश्चिम रेल्वेने विरार ते नालासोपारादरम्यानच्या उपनगरी फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. साचलेल्या पाण्यामुळे पश्चिम रेल्वेवरील नवसारी, बिलिमोरा, बलसाड, वापी, डहाणू रोड, विरार, नालासोपारा स्थानकांत आणि त्या दरम्यान २३ मेल-एक्स्प्रेस गाडय़ा उभ्या होत्या. वसई रोड स्थानकात सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने या गोंधळात भर पडली. त्यामुळे यातील काही गाडय़ांना त्याच स्थानकात शेवटचा थांबा देऊन पुन्हा परतीच्या मार्गावर पाठवण्यात आले, तर काही गाडय़ा रद्दच करण्यात आल्या.

नालासोपारा स्थानकापासून काही अंतरावर पहाटे चारपासून वडोदरा एक्स्प्रेस खोळंबली होती. तब्बल एक हजार प्रवासी गाडीत अडकून होते. सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि लोहमार्गावरील पाण्यामुळे ही गाडी सुरू होण्याची शक्यताही नव्हती. असे असूनही राष्ट्रीय आपत्ती निवारण दला (एनडीआरएफ)चे जवान तब्बल साडेदहा तासांनी म्हणजे दुपारी अडीच वाजता घटनास्थळी आले. सायंकाळी साडेपाचला सर्व प्रवाशांची सुटका झाली. एनडीआरएफला नेमके केव्हा कळविले गेले आणि या कारवाईत विलंब का झाला, याबाबत रेल्वेकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. पुणे-मुंबई इंद्रायणी आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करतानाच पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर्स गाडीही रद्द करण्यात आली. अचानक रद्द होत असलेल्या गाडय़ांमुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे हालच होत होते. मध्य रेल्वेलाही नालासोपारा, वसई रोड स्थानकांत साचलेल्या पाण्याचा फटका बसला. दुरान्तो एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेससह अन्य काही मेल-एक्स्प्रेस दौंड-मनमाड, इगतपुरी, जळगावमार्गेही वळवण्यात आल्या.

प्रवाशांना अन्नवाटप

पहाटे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबईतून सुटलेल्या पश्चिम रेल्वेवरील अनेक मेल-एक्स्प्रेस नवसारी, बिलिमोरा, वलसाड, वापी, डहाणू, नालासोपारा येथे अडकून पडल्या होत्या. प्रवाशांसाठी असणारे खाद्यपदार्थही संपल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी खाद्यपदार्थाची पाकिटे वाटली. जवळपास सोळा हजारपेक्षा जास्त पाकिटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.

पश्चिम रेल्वेवरील एक्स्प्रेस गाडय़ा अन्य मार्गाने

पश्चिम रेल्वेवरील १७ गाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन गरीब रथ, वांद्रे टर्मिनस-गोरखपूर अवध एक्स्प्रेस गोल्डन टेम्पल या गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला.