सोमवारपासून २८ मार्चपर्यंत आठ तास वाहतूक दुय्यम धावपट्टीवरून

मुंबई : पुनर्बाधणी आणि अन्य डागडुजीच्या कामानिमित्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी रविवार आणि काही विशेष दिवस वगळता ४ नोव्हेंबर ते २८ मार्च या काळात अंशत: (दिवसातील आठ तास) विमान वाहतुकीसाठी बंद ठेवली जाणार आहे.

दिल्लीनंतर देशातील सर्वात व्यग्र विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पर्यटनाच्या ऐन हंगामात अंशत: बंद राहिल्याने प्रवाशांना फटका बसू शकेल. या काळात विमान फेऱ्या घटून तिकिटांची किंमत वाढू शकेल, असा अंदाज आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपासून सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मुख्य धावपट्टी बंद असेल. या काळात सर्व विमान वाहतूक दुय्यम धावपट्टीवरून होईल. रविवार आणि काही विशेष दिवसांसाठी मात्र मुख्य धावपट्टी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. विशेष दिवसांमध्ये नाताळ (२५ डिसेंबर), नववर्ष (१ जानेवारी),  १९ आणि २१ फेब्रुवारी, १० आणि २५ मार्चचा समावेश असेल.

धावपट्टीची पुनर्बाधणी, नव्याने आच्छादन तयार करण्यासारखी अन्य कामे १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पावसामुळे ती पुढे ढकलावी लागली. तसेच या कामामुळे मुख्य धावपट्टी दिवसातून किमान आठ तासांसाठी बंद ठेवावी लागेल याबाबत विमान कंपन्यांना वर्षभरापूर्वीच कल्पना देण्यात आली होती. हे काम कधी सुरू होईल, कधी संपेल याचा कालावधीही कळविण्यात आला होता. त्यानुसार विमान फेऱ्या आणि सेवांची आखणी करण्याचे कंपन्यांना सूचित करण्यात आले होते, असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.

ताशी ४६ विमानांचे उड्डाण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीवर ताशी ४६ विमाने उतरतात, उड्डाण घेतात. दिवसा सरासरी हजार विमानांची ये-जा या धावपट्टीद्वारे होते. येथील दुय्यम धावपट्टीची ताशी ३६ विमान वाहतुकीची क्षमता आहे. मुख्य धावपट्टी बंद असताना या धावपट्टीची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या काळात प्रवाशांना मनस्ताप होऊ नये यासाठीची तजवीज, जुळवाजुळव विमान कंपन्यांकडूनही सुरू असल्याचे समजते.

प्रवास महागणार

डागडुजीनिमित्त मोठय़ा कालावधीसाठी मुख्य धावपट्टी बंद करण्याची ही या वर्षांतली दुसरी वेळ आहे. याआधी ७ फेब्रुवारी ते ३० मार्च या काळात मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली होती. त्यामुळे विमान फेऱ्यांची संख्या घटली. परिणामी तिकीट दरांत पाच ते १० टक्के वाढ झाली होती. यंदाच्या डागडुजीमुळेही आधीच महागलेल्या तिकिटांचे दर आणखी वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.