करोना विरोधातील लढाईसाठी पालिकेच्या विविध विभागांनी आतापर्यंत जो छोटा-मोठा खर्च केला, त्याचे सगळे दस्तावेज, देयके, मागवलेल्या वस्तूंची छायाचित्रे जपून ठेवा, असे निर्देश पालिकेच्या दक्षता विभागाने सर्व संबंधित विभागांना दिले आहेत.

पालिकेने आतापर्यंत जो खर्च केला त्यात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत असल्यामुळे हे निर्देश देण्यात आल्याचे समजते.

करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी भव्य करोना उपचार केंद्रे उभारली. या काळात मुखपट्टया, औषधे, कंत्राटी मनुष्यबळ, शवपिशव्या अशा असंख्य गोष्टींवर कोटय़ावधी रुपये खर्च झाले. मात्र, यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. करोना उपचार केंद्राच्या कंत्राटात, औषधांच्या तसेच शवपिशव्यांच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर पालिकेवर टीका करण्यात आली होती. काही प्रकरणांत खरेदीबाबतचे अनेक निर्णय हे युद्धपातळीवर घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनातर्फे देण्यात आले होते. आता मात्र दक्षता विभागाने जुलै अखेरीस परिपत्रक काढून सर्व संबंधित विभागांना सर्व खर्चाचे तपशील जपून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत नियमावलीही जाहीर केली आहे.

खर्च ६५० कोटींहून अधिक

करोनाकाळात भव्य करोना उपचार केंद्र उभारण्यासाठी केलेल्या अभियांत्रिकी, विद्युत व यांत्रिकी कामाचे, खाद्य पुरवठय़ाचे, औषधांचे, मुखपट्टय़ांच्या खरेदीचे असे सगळे दस्तावेज जपून ठेवण्याबाबत यात सूचना देण्यात आल्या आहेत. वस्तूंची खरेदी संदर्भातील कागदपत्रे, देयके , खरेदी के लेल्या वस्तूंची छायाचित्रे, वस्तूंच्या दर्जाविषयीची प्रमाणपत्रे जपून ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.  पालिकेने आतापर्यंत करोनाप्रतिबंधक उपाययोजनांवर तब्बल साडेसहाशे कोटींहून जास्त खर्च केला आहे.