मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर दर दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून २२६ गाडय़ांच्या साहाय्याने तीन हजारांच्या आसपास लोकलसेवा चालवल्या जातात. प्रत्येक गाडी दिवसाला अंदाजे ७०० किलोमीटर धावते. त्यामुळे दर दिवशीच प्रत्येक गाडीची देखभाल दुरुस्ती अनिवार्य असते..

विचार करा, एखाद्या दिवशी मुंबईची उपनगरीय रेल्वेसेवा बंद पडली तर? सत्तरीच्या दशकात नियमित लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी असे दिवस अनुभवले असतील. त्या दशकातल्या रेल्वे कामगारांच्या संपाने भारतीय रेल्वेची चाकं थांबवली होती. पण आजच्या काळात, जिथे ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी दिवसातून किमान दोन वेळा शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करण्यासाठी या लोकल सेवेवर अवलंबून असतात तिथे ही लोकल सेवा बंद पडली तर? मुंबईची गती थांबेल ना!

ही गती थांबू नये, मुंबईतील आíथक गाडा अव्याहत चालूच राहावा, यासाठी रेल्वेकडून ही उपनगरीय लोकलसेवा अखंड चालू ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापकीच एक म्हणजे उपनगरीय लोकल गाडय़ांची देखभाल दुरुस्ती!

सध्या मुंबईच्या उपनगरीय मार्गावर मध्य रेल्वेवर १३६ आणि पश्चिम रेल्वेवर ९० उपनगरीय लोकल गाडय़ा चालवल्या जातात. यातील प्रत्येक गाडी दर दिवशी सरासरी १०१२ फेऱ्या मारते. त्यामुळे या २२६ गाडय़ांच्या माध्यमातून मध्य रेल्वेवर १६६० आणि पश्चिम रेल्वेवर १३२०च्या आसपास सेवा चालवल्या जातात. चर्चगेटपासून डहाणूपर्यंत एका सरळ रेषेत असलेली पश्चिम रेल्वे आणि सीएसटी ते पनवेल, कर्जत, कसारा अशी औरसचौरस पसरलेली मध्य रेल्वे या मार्गावर धावणारी प्रत्येक लोकल गाडी दिवसाला सरासरी ७०० किलोमीटरचं अंतर कापते. त्यामुळे दर दिवशी या गाडीची देखभाल दुरुस्ती दर दिवशी करणं अत्यावश्यक ठरतं.

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना कारशेड हा शब्द माहीत असतोच असतो. अनेकांना तर अमुक गाडी अमक्या कारशेडची आहे, हेदेखील वाचायची सवय असते. उपनगरीय गाडय़ांची देखभाल दुरुस्ती या कारशेडमध्येच होते. उपनगरीय गाडय़ांना रेल्वेच्या परिभाषेत ईएमयू कार म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर युनिट कार म्हटलं जातं. या गाडय़ा विद्युत प्रवाहावर चालतात आणि १२ डब्यांच्या प्रत्येक गाडीत चार मोटर कोच म्हणजेच मोटर बसवलेले डबे असतात. जुन्या गाडय़ांमध्ये ज्या डब्यांमधून ‘गुर्रगुर्रगुर्र’ असा अत्यंत त्रासदायक आवाज यायचा, तेच हे मोटर कोच! तर या ईएमयू कारची दुरुस्ती कारशेडमध्ये होते. रेल्वेमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक शेडय़ूल किंवा वेळापत्रक ठरलेलं असतं. त्याप्रमाणे या गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीचं वेळापत्रकही अगदी ठरलेलं असतं.

मध्य रेल्वेवर सध्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा ही तीन कारशेड आहेत. तर पश्चिम रेल्वेवर आशिया खंडातील सर्वात मोठं कारशेड अशी ओळख असलेलं विरार कारशेड आणि मुंबई सेंट्रल कारशेड अशी दोन कारशेड आहेत. उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या सगळ्याच गाडय़ा रात्रीच्या वेळी कारशेडमध्ये सामावल्या जाणं अशक्य असतं. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या स्थानकांजवळ काही मोकळ्या रेल्वेमार्गावर गाडय़ा रात्रीच्या वेळी उभ्या केल्या जातात. या मार्गाना स्टेबिलग लाइन्स किंवा सायिडग असं म्हणतात. दर रात्री रेल्वेचे गँगमन आणि कर्मचारी दोन-दोन किंवा तीन-तीन अशा तुकडय़ांमध्ये या प्रत्येक सायिडगजवळ किंवा स्टेबिलग लाइनवर जाऊन त्या गाडीची देखभाल दुरुस्ती करतात.

विचार करा, रात्री मुसळधार पाऊस पडताना आपण घरात दुलईमध्ये स्वत:ला गुंडाळून शांत झोपतो, त्या वेळी रेल्वेचे हे कर्मचारी अंधाऱ्या सायिडगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या लोकलची देखभाल करत फिरतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या सायिडग लाइनमध्ये प्रचंड गवत उगवलेलं असतं, चिखलाचा रबरबाट झालेला असतो. तरीही हे कर्मचारी तशा अगोचर वेळी त्या सायिडग लाइनपर्यंत पोहोचण्यापासून गाडय़ा तपासण्यापर्यंत विविध कामं करत असतात. त्यांच्याकडे प्रखर प्रकाश पाडणाऱ्या विजेऱ्या असतात. ते प्रत्येक डब्याची चाकं, ब्रेक पॅड्स, कपिलग, इतर तांत्रिक गोष्टी तपासत तपासत पुढे जातात. एक डबा तपासायला त्यांना साधारण १०-१२ मिनिटांचा कालावधी लागतो. अशा पद्धतीने १२ डब्यांची एक गाडी पूर्ण तपासण्यासाठी त्यांना साधारण दोन तास लागतात. या कामगारांची नजर इतकी तयार असते की, त्या अंधारातही गाडीत काही तांत्रिक दोष असेल, तर तो त्यांच्या लक्षात येतो. अशा वेळी त्या तांत्रिक दोषाबद्दलची सूचना ते लगेच आपल्या वरिष्ठांना देतात. त्यानुसार ती गाडी वेळापत्रकाच्या आधीच कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी येते.

अन्य गाडय़ा मात्र वेळापत्रकाप्रमाणेच दुरुस्तीसाठी येतात. दर दहा दिवसांनी या गाडय़ा छोटय़ा देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये येतात. या देखभाल-दुरुस्तीसाठी चार तासांचा अवधी लागतो. त्यात गाडय़ांची चाकं, ब्रेक प्रणाली, विद्युत प्रणाली अशा महत्त्वाच्या गोष्टींची तपासणी केली जाते आणि चाचणीही घेतली जाते. त्यात काही दोष आढळल्यास त्या गोष्टी तातडीने बदलल्या जातात. हे भाग बदलल्यानंतर गाडी कारशेडमध्येच चालवून या नव्या भागामुळे गाडी चालताना विचित्र काही घडत नाही ना, हेदेखील तपासलं जातं. ही छोटेखानी देखभाल दुरुस्ती रात्रीच्या वेळी होते आणि गाडी सकाळी पुन्हा उपनगरीय सेवेत जाण्यासाठी सज्ज होते. यासाठी १८ ते २० कामगारांचा एक गट रात्रभर डोळ्यात तेल घालून गाडीचं तेलपाणी बघत असतो.

देखभाल दुरुस्तीचं मोठं वेळापत्रकही रेल्वेकडे तयार आहे. या मोठय़ा वेळापत्रकानुसार रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या जुन्या डीसी-एसी गाडय़ा किंवा एसी रेट्रोफिटेड गाडय़ा दर ३० दिवसांनी कारशेडमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी आणल्या जातात. तर सिमेन्स गाडय़ांसाठी हा अवधी ४५ दिवसांचा आहे. हे वेळापत्रक साधारण सहा ते आठ तासांचं असतं. अनेकदा गाडय़ा ठरलेल्या वेळेच्या दीड दोन तास नंतर कारशेडमध्ये आणल्या जातात. पण त्यांची देखभाल दुरुस्ती पूर्ण करताना मात्र ठरलेल्या वेळेतच करावी लागते. ही देखभाल दुरुस्ती दिवसाच्या वेळेतच होते. जुन्या गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती करताना कर्मचाऱ्यांना आठ-आठ तास कमी पडतात. हे आठ तास कर्मचारी पूर्णपणे कसून गाडय़ांची अगदी बारकाईने तपासणी करतात. खराब झालेले अनेक भाग बदलले जातात, गाडीच्या बोगीपासून ते पंखे-टयुबलाइट यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी योग्य आहेत का, हे तपासलं जातं. त्यानंतरच या गाडय़ा पुढे पाठवल्या जातात.

(पुढील भागात.. गाडीची साफसफाई)

Email – tohan.tillu@expressindia.com

@rohantillu