News Flash

आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आगळी लढाई!

तुम्हाला रोज दूध, केळी, अंडी दिली जातात.. उत्तम जेवण दिले जाते..

आदिवासी शाळांना भेट देण्याचा मैत्रीसंस्थेचा उपक्रम

तुम्हाला रोज दूध, केळी, अंडी दिली जातात.. उत्तम जेवण दिले जाते.. हे त्या विद्यार्थ्यांना सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.. दात घासण्यासाठी कोलगेटची पेस्ट, केसांना लावण्यासाठी पॅरॅशूट खोबरेल तेल अशा अनेक सुविधा आपल्यासाठी आहेत.. हे ऐकून काय बोलावे हेच त्या विद्यार्थ्यांना कळेना.. या वस्तू कधी मिळतात? हा त्यांचा भाबडा सवाल बरेच काही बोलून जातो.. अनेक आश्रमशाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहही नाही.. झोपण्यासाठी देण्यात येणाऱ्या गाद्यां वर खरे तर आदिवासी मंत्री, आमदार व मंत्रालयातील ‘बाबूं’नी एकदा तरी झोपून पाहावेच.. पावसाळ्यात रेनकोट द्यायचा नाही आणि थंडीमध्ये जो स्वेटर मिळायला हवा तो उन्हाळ्यात मिळणार हे आमचे नशीब.. शिक्षणाचा दर्जा आणि अभ्यासाच्या सुविधा याबाबत काय बोलणार? हा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुन्न करणारा आहे. या आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एक चळवळ आता उभी राहत आहे. ही ‘मैत्री’पूर्ण चळवळ सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करणार आहे. यातून आश्रमशाळांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील, असा विश्वास आहे.

राज्यात शासनाच्या ५४७ आश्रमशाळा आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळा असून या शाळांमध्ये अनुक्रमे १.८७ लाख व २.१० लाख विद्यार्थी शिकत आहेत. कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार या आश्रमशाळांच्या नावे सुरू असताना मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सारी यंत्रणा आश्वासनाशिवाय फारसे काही करताना दिसत नाही. परिणामी बहुतेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे जीवन कष्टप्रद असते. ही गोष्ट लक्षात घेऊन गेली सुमारे दोन दशके आदिवासी क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या पुण्याच्या ‘मैत्री’ संस्थेने अभिनव योजना हाती घेतली आहे.

सरकारला जागे करण्याचा प्रयत्न

आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोक तसेच स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांचे पथक निर्माण करून त्यांच्या माध्यमातून आदिवासी शाळांना भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या ‘शोध’मोहिमेत सर्वानीच सामील व्हावे, असे आवाहन ‘मैत्री’च्या विनीता ताटके यांनी केले आहे. आपापल्या भागातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, तसेच त्यांचा दर्जा याची नेमकी माहिती मिळत गेल्यास शासनाला ‘जागे’ करण्याचे काम करता येईल, असे विनीता ताटके यांचे म्हणणे आहे. यासाठी ज्यांना या लढाईत सहभागी व्हायचे आहे त्यांनी सोमवार ते शुक्रवारमध्ये दूरध्वनी क्रमांक ०२०-२५४५०८८२ वर संपर्क साधावा, असे आवाहन ‘मैत्री’ संस्थेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 12:02 am

Web Title: maitri ngo visit to tribal schools
Next Stories
1 विलास शिंदेंच्या कुटुंबियांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
2 मुंबई गोवा महामार्गावर अपघात, २ जण ठार
3 मेट्रो मार्गासाठी मुंबई सेंट्रल आगाराचा बळी?
Just Now!
X