राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यभरातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्या वेळी बाधित शेतकऱ्यांना मदतीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्य़ांसह विदर्भ, कोकण, मराठवाडय़ातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे रब्बी पिके  उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषत: गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.