मुंबईच्या माझगाव परिसरातील बंदुकवाला इमारतीला बुधवारी आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि पाण्याचे ७ टँकर्स घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.  दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लाकडी बांधकाम असलेल्या बंदुकवाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली.  लाकडी बांधकाम असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. आगीच्या वृत्तानंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.  या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीमुळे या इमारतीनजीकच्या वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला होता.  अंजिरवाडी आणि लवलेन मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. तर दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूकही अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. सध्या अग्निशामन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.