दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरातील एका इमारतीला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. येथील जुन्या हनुमान गल्लीतील गोकुळ निवास नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागातील ३३ क्रमांकाच्या इमारतीमध्ये ही आग लागली आहे. गेल्या तासभरापासून अग्निशामन दलाच्या ८ गाड्या आणि ७ पाण्याचे बंब ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, या परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती आणि अरूंद जागा यामुळे अग्निशामन दलाला इमारतीपर्यंत नीटपणे पोहचण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूच्या इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी तीनजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे.