६० हून अधिक गाळे खाक; जुन्या इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
दक्षिण मुंबईतील महात्मा जोतिबा फुले मंडईला (क्रॉफर्ड मार्केट) रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. फळबाजाराजवळ लागलेल्या या आगीत वस्तूंचे पॅकिंग करायला ठेवलेल्या मालाने तसेच लाकडी पोटमाळ्यावरील सामानाने पेट घेतला. या आगीत कडधान्य, सुकामेवा, विद्युत उपकरणे, चॉकलेट, अत्तर अशा विविध वस्तूंचे साठहून अधिक गाळे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन दलाकडील माहितीनुसार पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी या आगीबाबत वर्दी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर आगीचे स्वरूप पाहून दोन क्रमांकाची वर्दी देण्यात आली. दहा अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्यास सुरुवात झाली. तळमजल्यावरील फळबाजारात ही आग पसरली होती. शंभर ते सव्वाशे चौरस फुटांचे गाळे असलेल्या या भागात वेगाने आग पसरण्याचा धोका होता. आठ वाजता आग आटोक्यात येण्यास सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. दरम्यान पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
चार वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी स्थानकानजीक, याच परिसरात मनीष मार्केटला पहाटे मोठी आग लागली होती. पोटमाळे, इलेक्ट्रिक वस्तू, अनधिकृत बांधकाम यामुळे ही आग वेगाने पसरली होती व दोन दिवस धुमसत होती. या आगीनंतर पालिकेकडून अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या वर्षी काळबादेवी दुर्घटनेनंतरही पालिकेने जुन्या इमारतींमधील अनधिकृत बांधकाम व मालावर सुरू केलेली कारवाई थंडावली आहे.