२८ सनदी अधिकाऱ्यांच्या अल्पावधीतच बदल्या

राज्य शासनाने सनदी सेवेतील २८ अधिकाऱ्यांच्या वर्षां-दीड वर्षांतच बदल्या करून प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या करून त्यांच्या जागी नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत. शिक्षण आयुक्तांच्या तीन वर्षांत तीन वेळा बदल्या करण्यात आल्या. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द करून त्यांची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.

पुढील वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आल्याची चर्चा आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अगदी कमी कालावधीत बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग खुशवाह यांची विक्री कर विभागात सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कर्वे यांच्यावर मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नवी मुंबई येथे पणन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या परिवहन आयुक्तपदावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांची बदली महाऊर्जाचे महासंचालक म्हणून करण्यात आली. शिक्षण आयुक्तपदाची जबाबदारी विशाल सोलंकी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली करून त्यांच्यावर पुणे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुगदल यांना नागपूरचेच जिल्हाधिकारी करण्यात आले आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

बुलढाण्याचे जिल्हाधिकारी सी. एस. फुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त संजय यादव यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

  • पुढील वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, बऱ्याच अधिकाऱ्यांच्या अगदी कमी कालावधीत बदल्या करण्यात आल्या आहेत.