बुधवारी जलवाहिनी फुटल्याने घरांच्या भिंतींना तडे; तर अनेक वाहने वाहून गेली
घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमधील ७२ इंचांची जलवाहिनी बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फुटली. या मोठय़ा आकाराच्या जलवाहिनीतून प्रचंड दाबाने व वेगाने बाहेर पडलेल्या पाण्यामुळे शेजारच्या घरांचे पत्रे तुटले, भिंतींना तडे गेले तसेच अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. पावसाळ्यापूर्वीच अचानक आलेल्या या पुराने घरातील सामान वाचवताना रहिवाशांची तारांबळ उडाली व पळापळ झाली.
संपूर्ण राज्याबरोबरच मुंबईतही आधीच पाण्याची कमतरता असताना जलवाहिनीला तडा गेल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. गुरुवारी दुपारी जोगेश्वरीमधील बांदेकर वाडी येथील १२ इंची व्यासाची जलवाहिनीही फुटली.
पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याचे जोरदार फवारे उडाल्याने रस्त्यालाही खड्डे पडले.
रस्त्यावर असलेली वाहनेही या वेगाने वाहून दूरवर गेली. त्यामुळे असल्फा भागात काही काळ पूरस्थिती निर्माण झाली होती.
पावसाआधीच अकस्मात आलेल्या पुरात घरातील साहित्य भिजल्याने तेथील रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला ११ वाजता या घटनेची माहिती मिळाली. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
जलवाहिनीतील पाणी रोखण्यासाठी येथील संपूर्ण विभागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र त्यानंतरही जलवाहिनीतील पाणी थांबण्यासाठी काही तास गेल्याने आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसरात दोन फूट पाणी साचले होते. आपत्कालीन स्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून वृद्ध नागरिक, मुले व स्त्रियांना सुरक्षित स्थळी नेण्याची कार्यवाही करण्यात आली.
काही भागांतील पाणीवितरणावर परिणाम
महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीला सुरुवात केली. तब्बल अकरा तासांनंतर गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता जलवाहिनी ठीक करण्याच्या प्रयत्नांना यश आले. मात्र पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी आणखी पाच तास लागले. त्यामुळे असल्फा व्हिलेज, एस. एन. रोड, खैराणी रोड परिसरातील रहिवाशांना पाणीकपात सहन करावी लागली. शुक्रवारीही पाणीवितरणामध्ये काही भागांत परिणाम होईल, अशी माहिती जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. घाटकोपरनंतर गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी येथील १२ इंचांची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.