27 September 2020

News Flash

पुरुषांसाठी बॅटबॉल, मोबाइल तर महिलांसाठी म्हाळसा पिन

पुरुषांसाठीच्या दागिन्यांमध्ये मर्यादा असतात.

 

समकालीन आणि पारंपरिकतेचा मेळ साधलेले हलव्याचे दागिने बाजारात

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हलव्याचे दागिने लेवून खास ‘फोटोशूट’ करण्याची नवविवाहितांमधली हौस ओळखून आतापर्यंत ठरावीक ‘डिझाइन’मध्येच उपलब्ध असलेल्या हलव्याच्या दागिन्यांमध्येही आता नवता येऊ लागली आहे. यात आगळीवेगळी ठुशी, ‘म्हाळसा’ची खास केसांची पिन यांबरोबरच नवरेमंडळींची हौस पूर्ण करण्यासाठी हलव्यांमध्ये ल्यायलेले बॅटबॉल आणि मोबाइल फोनसारख्या वस्तू यंदा बाजारात विक्रीकरिता आल्या आहेत.

साखरेपासून बनलेला हलवा विरघळू नये म्हणून त्याचे दागिने कोरडय़ा हवामान असलेल्या भागात तयार केले जातात. मुंबईतील दमट हवामान असलेल्या बहुतांश दागिने पुणे, नाशिक कोरडे वातावरण असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये तयार करवून घेऊन मुंबईत विक्रीला आणले जातात. यात मंगळसूत्र, शाही हार, पाटल्या, तोडे, वाकी, कमरपट्टा, चाप नथ, भोकर, अंगठी, वेल, पैंजण, जोडवी, ठुशी, चिंचपेटी, कुडय़ा, छल्ला, भांगसर, मेखला, मोहनमाळ असे विविध पारंपरिक अलंकारांचा समावेश असतो. संक्रातीच्या दिवसांत नवविवाहितांनी हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा पारंपरिक असली तरी सध्याची फॅशन, मालिकांमधील पात्राने प्रचलित केलेल्या ठरावीक दागिन्यांचा परिणाम हलव्यांच्या दागिन्यांवर दिसतो आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील म्हाळसा या व्यक्तिरेखेने वापरलेली केसांची पिन यंदा ‘म्हाळसा पिन’ म्हणून हलव्याच्या दागिन्यांच्या रूपात ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. याबरोबरच पारंपरिक अलंकारातील लोकप्रिय ‘ठुशी’ ही हलव्याच्या दागिन्यांच्या रूपात बाजारात आली आहे. हे दागिने महिलांबरोबर पुरुषांसाठीही तयार केले जातात. मात्र पुरुषांसाठीच्या दागिन्यांमध्ये मर्यादा असतात. पण यंदा पुरुषांसाठी हार, घडय़ाळ, अंगठी, नारळ, पुष्पगुच्छ यांबरोबरच मोबाइल फोन, ब्रेसलेट आणि बॅटबॉलसारख्या वस्तू बाजारात आल्या आहेत, असे दादर येथे गेली ५० वर्षे हलव्यांच्या दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या ‘फॅमिली स्टोअर्स’च्या मालक कला जोशी यांनी सांगितले.

हलव्यांच्या दागिन्यांना वर्षांगणिक मागणी वाढते आहे. या दागिन्यांमध्ये वेगळेपण आणण्यासाठी त्या वर्षांतील प्रसिद्ध मालिका, सिनेमा यांमध्ये घातलेले दागिने घडविण्याकडे कलाकारांचा कल असतो. यंदा ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘म्हाळसा’, ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील ‘गौरी’ या व्यक्तिरेखेच्या नावाने दागिन्यांचे संच बाजारात पाहावयास मिळत आहेत, असे ‘समाधान लाडू मंदिर’ दुकानाचे संकेत झारपकर यांनी सांगितले.

तयारी सहा महिन्यांपासून

हलव्याच्या दागिन्यांची तयारी साधारण पावसाळा संपल्यानंतर सुरू करतात. साधारण सहा महिन्यांपूर्वीच पुण्यातील महिला बचत गट या दागिन्यांचे काम घेतात. सध्या पारंपरिक पद्धतीने दागिने तयार करण्याचे प्रमाण कमी झाले असून यंत्राच्या साहाय्याने किंवा मोत्यावर साखरेचा पाक घालून हलवे तयार करण्याचे प्रमाण जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2017 5:15 am

Web Title: makar sankranti jewelry in market
Next Stories
1 शिवसेनेने पाठिंबा काढावा ही तो पवारांची इच्छा!
2 मराठा आरक्षण आणखी लांबणीवर?
3 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘अहो.. राम गणेश..’
Just Now!
X