गणितावर केवळ प्रेमच नव्हे तर त्यामध्ये करिअर कसे करता येऊ शकते हे सांगण्यासाठी येत्या मे महिन्यात मुंबईत राष्ट्रीय पातळीवरची कार्यशाळा होणार आहे.  मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन विभागात गणित हा विषय शिकवणारे प्राध्यापक मंदार भानुशे व त्यांच्या काही प्राध्यापक मित्रांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गणितज्ज्ञ घडविणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणित या विषयाची गोडी वाटावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे प्राध्यापक भानुशे सांगतात.  आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सहा दिवसीय कार्यशाळा मे महिन्यात उत्तन येथील रामरत्न विद्यामंदिर येथे होईल. यासाठी देशातून १०० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी raisingamathematician@gmail.com या ई-मेल आयडीवर आपले अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९४२२४८३४००,९८२०५०९४८४ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा http://www.raisingamathematician.com या संकेतस्थळ पहावे.