‘स्वच्छ भारत अभियाना’च्या प्रबोधनासाठी बॅनरबाजी
‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या केंद्रीय पथकाला भुलविण्यासाठी पालिका प्रशासनाने संपूर्ण शहरात बॅनर्स झळकविण्याचे आदेश विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. न्यायालयाने मुंबई बॅनर्समुक्त करण्याचे आदेश दिले असतानाही पालिकेने बॅनरबाजी करीत मुंबईत स्वच्छतेबाबत प्रबोधन करीत असल्याचा आभास निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येत होते. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष आदींचे पदाधिकारी, कार्यकारी आणि नेते त्यात सहभागी झाले होते. दररोज सकाळी प्रभागात सफाई कामगार साफसफाई करताना तेथे नगरसेवक जातीने उपस्थित राहात होते. परंतु अल्पावधीतच साफसफाईचा उत्साह मावळत गेला आणि ही मोहीम थंडावली. दरम्यान, पालिकेच्या सर्व खात्यांमधील कर्मचाऱ्यांनी दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर दोन तास थांबून कार्यालयात साफसफाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु आता त्यातही पालिका अधिकारी-कर्मचारी कामचुकारपणा करू लागले आहेत. सकाळच्या सत्रात काम केल्यानंतर लवकर घरी पळणाऱ्या सफाई कामगारांना रोखण्यासाठी सकाळी ११ च्या सुमारास ‘समूह सफाई’ची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत दररोज एखादा रस्ता झाडून लख्ख करण्याची जबाबदारी कामगारांवर सोपविण्यात आली. त्याची छायाचित्रेही काढण्याचे आदेश देण्यात आले होते. आता या कामातही सफाई कामगार कंटाळा करू लागले आहेत. मात्र इतके प्रयत्न करूनही मुंबईतील झोपडपट्टय़ा आजही बकालच आहेत.
मुंबईमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ कशा पद्धतीने राबविण्यात येत आहे याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक ९ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होत असून आठ-दहा दिवस मुंबई मुक्कामी राहून हे पथक स्वच्छतेबाबत पाहणी करणार आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने पुन्हा एकदा स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपापल्या विभागामध्ये बॅनर्स लावण्याचे आणि भिंतींवर संदेश रंगविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अतिरिक्त आयुक्तांचे आदेश शिरसावंद्य मानून साहाय्यक आयुक्तांनी ठिकठिकाणी ‘ओला कचरा कुंडीत टाका, सुका कचरा भंगारवाल्याला विका’ असा संदेश देणारे बॅनर्स झळकविण्यास सुरुवात केली आहे. संदेशांनी भिंतीही रंगू लागल्या आहेत.
न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश देताच पालिकेने दिवस-रात्र एक करून अवघ्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणचे बॅनर काढून टाकले होते. आता ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पाहणीनिमित्त मुंबईत येणाऱ्यांना लोकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करीत असल्याचे दाखविण्यासाठी पालिकेनेच बॅनरबाजी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई विद्रूप होऊ लागली आहे. राजकीय नेते ज्या प्रमाण नाक्यानाक्यावर आपल्या वाढदिवसाचे फलक लावून शहराची वाट लावतात, त्या प्रमाण पालिकेने ही फलकबाजी सुरू केली आहे. एका वॉर्डात तर तब्बल १५० फलक लावण्यात आल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांचा उत्साह
२६ जानेवारीपर्यंत मुंबई फलक मुक्त करा, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. फलकबाजीबाबत न्यायालयाने वारंवार दिलेल्या कठोर आदेशांमुळे अधिकाऱ्यांनी स्वच्छतेबाबतचे फलक लावताना ते पालिकेच्याच मालमत्तेच्या ठिकाणी लावावे असे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच त्यासाठी ‘आठ बाय आठ’ ही आकाराची मर्यादाही ठरवून देण्यात आली होती. परंतु, काही उत्साही अधिकाऱ्यांनी विजेचे, सिग्नलचे खांब, रस्त्याच्या कडेला फलक लावताना हे भान बाळगले नाही. हे सरळसरळ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.