आगीच्या घटनेमुळे चौपाटीचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर; न्यायालयाने मागितला सरकारकडून खुलासा

गिरगाव चौपाटीवर २०१६ मध्ये राज्य सरकार आयोजित ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीमुळे चौपाटीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. आयोजक आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागून चौपटीचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आयोजक आणि कंत्राटदारावर कारवाई करणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. तसेच त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीमुळे चौपाटीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे चौपाटीचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून चौपाटीवर यापुढे केवळ रामलीला-कृष्णलीला, गणेश विसर्जन आणि नाताळ हे तीन कार्यक्रम वगळता अन्य कुठल्याच कार्यक्रम, सभांना परवानगी मिळणार नसल्याचे न्यायालयाने जून महिन्यात या प्रकरणी निकाल देताना स्पष्ट केले होते. तसेच आगीच्या घटनेमुळे चौपाटीचे जे काही नुकसान झालेले आहे त्याची भरपाई म्हणून दोन महिन्यांत ही जागा पूर्ववत करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीमुळे चौपाटीच्या झालेल्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्याने अहवाल सादर करत कार्यक्रमाचे आयोजक आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. व्यासपीठाजवळ ज्वलनशील वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आग भडकली आणि त्यात चौपाटीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, असेही अहवालात म्हटले होते. या अहवालाचा विचार करता तसेच आगीच्या घटनेमुळे चौपाटीचे झालेले नुकसान लक्षात घेता कार्यक्रमाचे आयोजक आणि कंत्राटदारावर कारवाई करणार का, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच त्याचा निर्णय सरकारने तीन आठवडय़ांत स्पष्ट करावा, असे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.