पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ’मेक इन इंडिया’चे उद्दिष्ट  दशकभरात शक्य आहे, असा आशावाद ज्येष्ठ वैज्ञानिक विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे. भारतीय नेतृत्त्वाने जेव्हा जेव्हा उद्योगांना आवाहन केले तेव्हा तेव्हा त्याला यश आले आहे, असेही ते म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उद्योग आणि आयटीचा विकासही कसा झाला याचा आढावा भटकर यांनी घेतला. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ’इनोव्हेट अँड मेक इन इंडिया’ या चर्चासत्रात ते बोलत होते. यात केएचआयटीचे अध्यक्ष रवी पंडित, प्राज इंडस्ट्रिजचे प्रमोद चौधरी हेही सहभागी झाले होते. येत्या दहा वर्षांत आपण संशोधन आणि विकासात इतके काम करू की परदेशात आपल्या तंत्रज्ञांचे महत्त्व वाढेल. येणारा काळ हा वैयक्तिक तंत्रज्ञानाचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा मोबाइल, कार किंवा इतर गॉजेट्स विकसित करुन मिळतील. सध्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे तरूणांपकी अनेकजण भविष्यात स्वत:च्या कंपन्या स्थापन करून रोजगार निर्मिती करतील असेही ते म्हणाले.
इनोव्हेशनसोबतच रोजगार निर्मितीचीही मोठी गरज असल्याचे मत  प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.  त्यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक प्रोत्साहन द्यावे असेही ते म्हणाले.
नवीन सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून नव उद्योजकांना एक प्राथमिक दिशा दाखवून दिली आहे असे मत रवी पंडित यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.