चंद्रकांत पाटील यांचे आदेश; अन्यथा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

मुंबई : मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी प्रामुख्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे या कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग वाहतुकीसाठी सुयोग्य करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल असा सक्त इशारा सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिला. तसेच गणेशोत्सवात मुंबई- कोल्हापूर महामार्गाने कोकणात जाण्यासाठी टोलमाफी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम. त्यातच खड्डय़ांमुळे महामार्गाची झालेली दुर्दशा आणि नजीकच्या काळात येणारा गणेशोत्सव तसेच  खड्डे भरण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते.  मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही पाटील यांनी  दिले.

मुंबई- कोल्हापूर मार्गावरही टोलमाफी

गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अनेकजण मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गेदेखील प्रवास करतात. त्यामुळे या महामार्गावरील टोलनाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षीप्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी असे निर्देशदेखील सदर बैठकीत देण्यात आले.