विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आलेला असतानाच विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे  केली.

करोनामुळे किती काळ अशीच परिस्थिती राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार असा प्रश्न करीत विद्यार्थ्यांंना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे. यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधत करोना उपाययोजनांचा आढावा घेतला.

राज्याच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार हे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे असे  त्यांनी  सांगितले.

अंतिम वर्षांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. तर देशाच्या एकूण करोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून करोनाला हरविले तर देश जिंकेल, असा विश्वास मोदी यांनी बैठकीत व्यक्त केला.

करोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही नोंद(केस) लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली जात असून, करोनाबाबत काहींच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नसल्याची बेपर्वाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबुरीदेखील आहे अशा तीन अवस्थेत करोनाचा सामना सुरू असल्याचे सांगितले.

‘लढाई संपलेली नाही’

मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल र्सवत्र कौतुक होत आहे. मात्र अजूनही लढाई संपली नाही. करोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्व जिल्ह्य़ांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये

राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून करोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचेही ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले.

शिवभोजन योजनेचा लाभ

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवडय़ात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.